Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ज्येष्ठ समाजसेवक मनोहरराव वखरे यांचे निधन
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

भारत सेवक समाजचे सरचिटणीस ज्येष्ठ समाजसेवक मनोहरराव माधवराव वखरे यांचे शनिवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने धंतोलीतील अवंती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
२५ मार्च १९१७ रोजी नागपुरात जन्मलेले मनोहरराव वखरे यांनी बी.ए. ऑनर्स व एल.एल.बी. केले होते. तत्कालीन जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पं. बच्छराज व्यास यांच्यासोबत त्यांनी काही काळ वकिली केली. परंतु समाजासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेने नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून बंगालमध्ये गेले. त्यानंतर ते दिल्ली येथील भारत सेवक समाजाचे सरचिटणीस म्हणून कार्य केले. त्यांनी त्यांचे सारे जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतले होते.
मनोहरराव यांनी भारतीय आदिम जाती सेवक संघातर्फे देशभरात ठिकठिकाणी पाळणाघर, बालवाडय़ा व वृद्धाश्रमाच्या माध्यमातून भरीव कार्य केले. मानेवाडा येथे आदिवासी कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र स्थापन करून आदिवासी युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम केले.
यवतमाळ, गडचिरोली परिसरात त्यांनी पाणलोट कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला. व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी आयुष्यभर आदिवासी, महिला व दीनदुबळ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला.