Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

डुप्लीकेट प्रवेशपत्र मिळाल्याने एमपीएससीची परीक्षा सुरळीत
नऊ केंद्रांवर १८०० विद्यार्थ्यांची हजेरी
नागपूर, ७ जून/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्यलोकसेवा आयोगातर्फे विशेष समाजकल्याण अधिकारी पदासाठी आज घेण्यात आलेल्या परीक्षेचे डुप्लीकेट प्रवेशपत्र जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे सुमारे ८५० विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली. नागपुरातील नऊ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. दोन दिवस आधीपर्यंत या परीक्षेचे प्रवेशपत्र काही विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले नव्हते, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता, हे विशेष.
विशेष समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या एकूण ३५ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेसाठी नागपूर केंद्र देण्यात आले होते. १८०० विद्यार्थ्यांनी शहरातील नऊ केंद्रावरून ही परीक्षा दिली. सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. नाव नोंदवलेल्या पण, वेळेपर्यंत प्रवेशपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर ९० आणि जिल्हाधिकारी कार्यालयात १० डुप्लीकेट प्रवेशपत्र ठेवण्यात आली होती. जेणेकरून अशा सर्व परीक्षार्थीना लगेच प्रवेशपत्र मिळून ते परीक्षा देऊ शकतील. एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला महाराष्ट्रातून ५,९१६ विद्यार्थी बसले होते.
यापैकी आज राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद या केंद्रावरही परीक्षा घेण्यात आली. नागपूर केंद्रावर या परीक्षेसाठी छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेलगतची गावे आणि गडचिरोली, चंद्रपूर, अहेरीपेक्षाही दुर्गम भागात राहणारे परीक्षार्थी उपस्थित होते.