Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जीवनदायी योजनेतील २७८ हृदयरुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

राज्य शासनाने सुरु केलेल्या जीवनदायी योजनेंतर्गत हृदयरुग्णांवर सुपर स्पेशालिटीमध्ये शस्त्रक्रिया केली जाते. परंतु, येथे हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञांची संख्या अत्यल्प असल्याने अनेक रुग्णांवर वेळेवर शस्त्रक्रिया होत नाही. गेल्या एक वर्षांपासून तब्बल २७८ हृदयरुग्ण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. वेळेवर शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याने अत्यवस्थ रुग्णांचे प्राण जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील गरीब नागरिकांकडे विविध दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीचे आर्थिक पाठबळ राहत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. अशांवर योग्य उपचार व्हावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य शासनाने ‘जीवनदायी योजना’ सुरू केली. या योजनेनुसार दारिद्रय़ रेषेखालील हृदयरुग्णांवरील शस्त्रक्रियेसाठी एक लाखापर्यंतची मदत केली जाते. या योजनेंतर्गत हृदयरुग्णांवरील शस्त्रक्रियेसाठी येथील सुपर स्पेशालिटी व गोकुलपेठेतील के.जी. देशपांडे रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे.
१ एप्रिल २००८ पासून मे २००९ पर्यंत जीवनदायी योजनेतंर्गत आरोग्य उपसंचालक कार्यालयाने २७८ हृदयरुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी मंजूरी दिली. सुपर स्पेशालिटीमध्ये हृदयरुग्णांवर शस्त्रक्रिया करणारे फक्त तीन शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत. त्यामुळे जीवनदायी योजनेंतर्गत येणाऱ्या रुग्णांवर त्वरित हृदय शस्त्रक्रिया केली जात नसल्याची माहिती प्राप्त झाली. हृदय रुग्णांवर वेळेवर शस्त्रक्रिया होत नसल्याने काही अत्यवस्थ रुग्णांचे जीवन धोक्यात आले आहे. हृदयरुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
आरोग्य उपसंचालक कार्यालयात दररोज किमान एक हृदयविकाराचा रुग्ण जीवनदायी योजनेंतर्गत अर्थिक मदत मागण्यासाठी येत असतो. आलेल्या अर्जावर उपसंचालकाच्या अध्यक्षतेखालील एक समिती विचार करून निर्णय देते. अर्ज मंजूर झाल्यास त्याला त्वरित शासनाच्या खात्यातून ठराविक रक्कम संबंधित रुग्णालयाकडे पाठवली जाते. आतापर्यंत २७८ रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम सुपर स्पेशालिटीकडे वळती करण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यानंतरही या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा पहावी लागत आहे. शासन लागणारा पैसा संबंधित रुग्णालयाकडे पाठवत असल्याने या रुग्णालयाने बोलावल्याशिवाय रुग्णांना तेथे जाता येत नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतरही रुग्णांना तीन-तीन महिने शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात येत नाही. सुपर स्पेशालिटीमध्ये दररोज किमान एक हृदयशस्त्रक्रिया करणे आवश्यक असताना आठवडय़ातून फक्त दोन ते तीनच शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
प्रतीक्षा यादीतील नागरिकांवर त्वरित हृदयशस्त्रक्रिया व्हावी व त्यांना नवे जीवन प्राप्त व्हावे, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता. २१ जून २००८ रोजी शहरातील चार खाजगी रुग्णालयाचे संचालक व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रवीभवनात बैठक बोलावली होती. या बैठकीत चारही खाजगी रुग्णालये आणि सुपर स्पेशालिटीमध्ये एका महिन्यात प्रत्येक ठिकाणी ३० हृदयरुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील, यासाठीचा मोबदला उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात येईल, असे ठरवले होते. परंतु या योजनेतील खाजगी रुग्णालयांनी सुरुवातीचे काही दिवस शस्त्रक्रिया केल्यानंतर एक लाख रुपयामध्ये हृदयशस्त्रक्रिया करणे परवडत नसल्याचे कारण देऊन शस्त्रक्रिया करणे बंद केले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे.