Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सिकलसेलग्रस्तांना रेल्वे प्रवास भाडय़ात सवलत देण्याची मागणी
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

सिकलसेलग्रस्तांना रेल्वे प्रवास भाडय़ात सवलत मिळावी अशी मागणी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाने रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
सिकलसेल हा आजार जेनेटिक असून हिमोग्लोबिनशी संबंधित आहे. देशातील १२ राज्यात सिकलसेल आजाराचा प्रभाव असून रुग्ण संख्या दहा लाखावर आहे. अशा रुग्णांना वर्षांतून किमान तीन-चार वेळा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. या आजाराच्या कह्य़ात समाजातील गरीब व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्टय़ा कमजोर वर्ग अडकलेला आहे. त्यांना रेल्वे प्रवासात सवलत द्यावी, अशी विनंती करणारी पत्रे सिकलसेल प्रभावग्रस्त भागातील ३० खासदारांना पाठ़ळण्यात आली आहे. या मागणीबाबत पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी रेल्वे मंत्री नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, आरोग्य मंत्री अंबुमनी रामदास, रेल्वे समितीचे अध्यक्ष वासुदेव आचार्य, आर.के. वर्मा यांच्याशी संपर्क साधून त्यांना सिकलसेलग्रस्तांचे दु:ख सांगण्यात आले. परंतु गेल्या सहा वर्षांत या मागणीकडे कुणाचेही लक्ष गेले नसल्याची खंत सिकलसेल ऑफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी व्यक्त केली.
रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी २००९-१० चा रेल्वे अर्थसंकल्प मानवीय व व्यापारी असेल असे नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे सिकलसेलग्रस्तांची मागणी पूर्ण होईल, अशी आशा रामटेके यांनी व्यक्त केली आहे.