Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हजारेंच्या हत्येच्या कट प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशीची मागणी
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या करण्यासाठी सुपारी देणऱ्याला त्वरित अटक करून त्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या संस्थेचे शहर अध्यक्ष डॉ. गोपाळ बेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
प्रारंभी व्हरायटी चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले असून बिहारमधील गुन्हेगार महाराष्ट्रात आणून हत्येच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत. अण्णांचे जीवन समाजसेवेसाठी समर्पित असून समाजपरिवर्तनाचे क्रांतीदर्शी कार्य ते अविरतपणे करीत आहेत. अण्णांच्या हत्येचा कट रचणारे पडद्यामागचे सूत्रधार उघडे पडले असून त्यामुळेच ते बेताल आरोप करीत सुटले आहेत. अण्णा हजारे गेल्या काही वर्षांपासून विविध क्षेत्रातील गैव्यवहाराच्या विरोधात एकटे संघर्ष करीत आहेत. अण्णांविषयी असे अवमानजनक विधान करावे हे महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, सुनिल जॉन, पुरुषोत्तम राऊत, संजय कटकमवार, गजानन भुतेकर, दीपक वंजारी, डॉ. दिलीप तिरपुडे, अजय पराते, एनएल सावरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.