Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वनमहोत्सवांतर्गत प्रत्येक जिल्ह्य़ात १ लाख रोपे लावणार
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

नागपूर विभागातील विविध भागातील नर्सरींमध्ये २४ लाख रोपे तयार करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्य़ात वनमहोत्सवांतर्गत १ लाख रोपे लावण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक जर्नेलसिंग यांनी दिली.
विविध नर्सरींमध्ये तयार करण्यात आलेल्या रोपांपैकी २१ लाख रोपे १ वर्षांपेक्षा मोठी आहेत. ५ जून या पर्यावरण दिवसापासून वनमहोत्सवातंर्गत १५ ऑगस्टपर्यंत विविध जिल्ह्य़ात वृक्षारोपणाचे कार्य व त्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी विविध शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या इको क्लबची मदत घेण्यात येत आहे. इको क्लबचे दहा हजारपेक्षा जास्त सभासद आहेत.
खाजगी क्षेत्रात वृक्ष लागवड व वैरण विकास योजनेंतर्गत नागपूर विभागात दरवर्षी ३ लाख हेक्टर जमीन वृक्ष लागवडीखाली आणली जाते. त्याची देखभाल तीन वर्षेपर्यंत वनविभागातर्फे केली जाते. या योजनेंतर्गत नागपूर विभागात सुमारे २५० कि.मी. अ‍ॅव्हेन्यू प्लॅन्टेशन करण्यात येणार असून त्यासाठी प्रति कि.मि. १ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. दीड वर्षांत हे अ‍ॅव्हेन्यू प्लॅन्टेशन करण्यात येणार असून त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती जर्नेलसिंग यांनी दिली. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल दीड वर्षांपर्यंत वनविभागातर्फे करण्यात येणार आहे. त्यानंतर ही झाडे ग्रामपंचायत व संबंधित प्राधिकरणाकडे सोपविली जातील. कडूनिंब, आंबा, आवळा, करंजी, शिसम, गुलमोहर, नीलमोहर, अमलताश, आपटा, वड, पिंपळ अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. राजभवनाच्या हरितीकरणासाठी व सुशोभिकरणासाठी दीड कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्यपालांच्या सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. राजभवनातील ३० हेक्टर परिसराचे हरितीकरण करण्यात येणार असून त्यासाठीही दीड कोटीचा प्रस्ताव मागील हिवाळी अधिवेशनादरम्यान सादर करण्यात आला होता. राजभवनाच्या ३० हेक्टर परिसरात येत्या तीन वर्षांत १५० जातीची रोपे लावण्यात येणार असल्याचे जर्नेलसिंग यांनी सांगितले.