Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षण सेवक नियुक्ती पूर्व परीक्षेसाठी सल्ला शिबीर
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राजे रघुजी नगरातील कल्याण भवनात ९ व १० जूनला शिक्षण सेवक भरती पूर्व परीक्षेसाठी नि:शुल्क योग्य सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी ८ ते १० या वेळेत होणाऱ्या या शिबिरात संबंधित विषयाचे अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक योग्य सल्ला देतील. त्यात पेपर सोडवण्याचे तंत्र, अभ्यासाची पद्धत आणि शॉर्टकट मेथड यावर विशेष भर देण्यात येणार आहे. इच्छुकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी राजे रघुजीनगरातील कामगार कल्याण भवनात किंवा ९८२३६०८८६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्र संचालक संजय जोसेफ यांनी केले आहे.
कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात. राज्य शासनाने शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी शिक्षक सेवक भरती पूर्व परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. या परीक्षेसंबंधी कामगारांच्या मुलांना योग्य माहिती उपलब्ध व्हावी व त्यांना परीक्षेत यश प्राप्त व्हावे, या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त कामगारांच्या पाल्यांनी घ्यावा, असे आवाहनही केंद्रातर्फे करण्यात आले आहे.