Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रामन विज्ञान केंद्रात आजपासून ऑलिंपियाड कार्यशाळा
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र या विषयांच्या ऑलिंपियाडच्या तयारीच्या दृष्टीने रामन विज्ञान केंद्रात ८ ते १० जूनदरम्यान कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
असोसिएशन ऑफ मॅथेमॅटिक्स टीचर्स ऑफ इंडिया (ए.एम.टी.आय.) आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन या संस्थांच्यावतीने दरवर्षी नॅशनल मॅथेमॅटिक्स टॅलेंट काँटेस्ट आणि नॅशनल ऑलिंपियाड परीक्षा घेण्यात येतात. नवीन पिढीतील ‘प्युअर सायन्स’ विषयाची प्रतिभा शोधण्याच्या उद्देशाने या परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व खगोलशास्त्र या विषयांमध्ये होतात. सहावी ते बारावीचे विद्यार्थी यात भाग घेऊ शकतात.
नागपूरचे रामन विज्ञान केंद्र हे अशा उपक्रमांच्या आयोजनाचे ‘नोडल सेंटर’ आहे. या केंद्राने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सोमवार ८ जूनला सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत ए.एम.टी.आय. आणि विभागीय मॅथ्स ऑलिंपियाड यावर सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा होईल. ९ तारखेला याच वेळेत सातवी, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्र ऑलिंपियाड (ज्युनियर)वर कार्यशाळा होणार आहे. १० तारखेला सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र (सीनियर) यावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय जीवशास्त्र ऑलिंपियाड परीक्षेबाबत जास्तीची माहिती देण्यासाठी मुंबईच्या झुनझुनवाला कॉलेजचे डॉ. पी.जी. काळे यांचे २१ जूनला सकाळी ११ ते दुपारी साडेबारा या वेळेत भाषण आयोजित करण्यात आले आहे. वरील सर्व कार्यक्रम नि:शुल्क असून विद्यार्थ्यांसह पालकांनी त्यांचा लाभ घ्यावा. आधी येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिले जातील, असे रामन विज्ञान केंद्राने कळवले आहे.