Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे उद्यापासून धरणे
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

पगारवाढ, पेंशन आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे तिन्ही वीज कंपन्यांच्या राज्यातील प्रमुख कार्यालयांपुढे ९, १० व ११ जूनला धरणे दिली जाणार असल्याचे कामगार नेते आणि संघटनेचे उपमहासचिव शंकर पहाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
९ जूनला कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासमोर, १० जूनला मानकापूरमधील वीज पारेषण कंपनीच्या कार्यालयासमोर तसेच ११ जूनला वीज वितरण कंपनीच्या काटोल मार्गावरील तसेच गड्डीगोदाममधील कार्यालयासमोर दिवसभर धरणे दिली जातील.
आंदोलनासंबंधी सखोल माहिती देताना शंकर पहाडे म्हणाले, निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही वीज कंपन्यांच्या प्रशासनाने कामगारांची कपात केली. कामगारांना अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही. वेळेपूर्वी कामे झाली नाहीत तर कारवाई केली जाते.
नवीन पगारवाढीसाठी तातडीने चर्चा करून पगरवाढीचा करार करा, पेंशनचा गुंता सोडवण्यासाठी सर्व संघटनांना विश्वासात घ्या, मृत कामगारांच्या वारसांचे प्रश्न तातडीने सोडवून त्यांच्या निवासी झोन्समध्ये सामावून घ्या, दोन वार्षिक वेतनवाढीपासून वंचित राहिलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतनवाढ द्या, स्टाप सेटअपच्या नावाखाली कामगारांची पदे कमी करण्याचा डव त्वरित बंद करा, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांना जास्त कामाचा मोबदला पूर्वीप्रमाणेच सुरू करा, महिला कर्मचाऱ्यांना सायंकाळी ६ वाजतानंतर कार्यालयात थांबवण्याची प्रथा बंद करा, सेवा नियमातील बदलाची पूर्वसूचना द्या, सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांना अनुभव व शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर बढती देण्यात यावी, बढतीची पदे भरताना अनुभव, शैक्षणिक पात्रता व सक्षम गुणवत्ता असणाऱ्या कंपनीच्या कामगार, अधिकाऱ्यांना प्राथमिकता देण्यात यावी, पदोन्नती देताना पूर्वीच्या पदावर दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची अट रद्द करावी, आऊटसोर्सिग बंद करावे आणि इतरही मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन असल्याचे पहाडे यांनी सांगितले. मेघना वाहोकार, दत्ता धामणकर, श्याम देशमुख, अशोक शिंदे व इतर पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.