Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

श्रमिक संघटना कृती समितीचे मेयो रुग्णालयापुढे निदर्शने
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील (मेयो) रद्द केलेल्या एम.बी.बी.एस.च्या ४० जागांना पुन्हा मंजुरी द्यावी व रुग्णालयाचा विस्तार करावा, या मागण्यांसाठी श्रमिक संघटना कृती समितीने निदर्शने केली. यानंतर एका शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
मेयो रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी कुणाचाही विरोध नाही. परंतु हा विकास करत असताना इतरही मुद्दे लक्षात घेतले पाहीजे. सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ६० कोटी, सोलापूरच्या महाविद्यालयाला २२.५४ कोटी, पुणे येथील बी.जे. महाविद्यालयाला ३३ कोटी, मिरजच्या महाविद्यालयाला २५ कोटी आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी ८.३३ कोटी रुपये दिल्या जावू शकते. तर मेयो रुग्णालयाच्या अत्याधुनिकीकरणासाठी पैशाची कमतरता का, असा प्रश्नही संघटनेचे संयोजक जम्मू आनंद यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
यानंतर जम्मू आनंद यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मेयो रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कांबळे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात अनिल हजारे, प्रेम जोगी, शेषराव गोतमारे, ईश्वर मेश्राम, शंकर मौर्य, आर.पी. पांडे यांचा समावेश होता.