Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या ‘अलाईव्ह’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

‘अलग अँगल’ तर्फे तृप्ती राठी, स्नेहल ओक-लिमये, दर्शना लक्झीमन आणि श्वेता भट्टड या चार तरुणींचे ‘अलाईव्ह’ चित्रप्रदर्शन आजपासून उत्तर अंबाझरी मार्गावरील रवींद्रनाथ टागोर आर्ट गॅलरीत सुरू झाले. ज्येष्ठ मेंदूरोगतज्ज्ञ व सिम्सचे संचालक डॉ. जी.एम. टावरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
या प्रदर्शनात अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेटिंग्ज, लिथो प्रिंट्स, क्रिएटिव्ह प्रिंटिंग, शिल्पकला आणि इन्स्टॉलेशन आर्ट पद्धतीच्या कलाप्रकारांचा आनंद रसिकांना घेता येईल. या चारही तरुणीच्या चित्रांच्या व शिल्पकलांची संकल्पना वेगवेगळी असून प्रत्येकांच्या कलाकृतीमधून एक वेगळा संदेश देण्यात आला आहे. मॉरेशसची दर्शना लक्झीमन यांनी चित्रातून स्त्रीयांच्या वेदना मांडल्या आहेत. दर्शनाची सर्वच चित्र तांत्रिक दृष्टय़ा अतिशय चांगली आहेत. तृप्ती राठीच्या चित्रांवर तिच्या जीवनातील आनंदाच्या क्षणांचा प्रभाव आहे तर, आजच्या धावपळीत प्रत्येकाला ताणतणाव असतो त्यातील काही क्षण कसे आनंदाने घालवायाचे याचे सुरेख चित्रण तृप्तीने तिच्या कलाकृतीतून सादर केले आहे. स्नेहल ओक -लिमये वन्यजीव आणि पर्यावरणप्रेमी असल्याने तिने मानवी आकृत्यांना प्राण्यांचे आकार देऊन त्या माध्यमातून प्राण्यांचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तिची चित्रे पर्यावरण आणि प्राण्यांना वाचवण्याची हाक देतात. दर्शनाची चित्रमालिका विचारचक्रावर आधारलेली आहे. अंतर्मनातील विचारांचे तरंग तिने चित्रांमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला आहे तर, मेणाचा वापर करून हुबेहुब खाद्यपदार्थ तयार करणारी नागपूरची श्वेता भट्टड हिच्या शिल्पकलेचा आनंदही रसिकांना घेता येईल. श्वेताने शिल्पकलेच्या माध्यमातून भृणहत्येचा संदेश दिला आहे. शिवाय फायबरपासून तयार करण्यात आलेली मासोळी रसिकांचे खास आकर्षण वेधून घेत आहे. आकाशाचे वेगवेगेळ रुपांची कल्पकता श्वेताने अतिशय सुंदर मांडली आहे. चित्रकार ललित विकमसी यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यावेळी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, विवेक रानडे, ज्येष्ठ शिल्पकार हिराचंद विकमसी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा समारोप मंगळवारी, ९ जूनला होणार आहे.