Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी -प्रवीण दराडे
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

आय.ए.एस., आय.पी.एस. झालेल्या तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी केले.
यवतमाळ जिल्ह्य़ातील डॉ. संदीप राठोड व अमितकुमार राठोड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल बंजारा समाजातर्फे नागपूर येथील सरपंच भुवन सभागृहात त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी दराडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. मोहन चव्हाण होते. जिल्हा माहिती अधिकारी मोहन राठोड, डॉ. रमेश आर्य हे उपस्थित होते.
आत्मविश्वासासह जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास हमखास यश मिळते, असे सांगून दराडे म्हणाले आता ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत. तांडा-वाडय़ावरील मुले प्रशासन सेवेत येत आहेत. तांडय़ावर राहणारा बंजारा समाज यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत, ही आनंदाची बाब आहे. प्रशासकीय सेवेत काम करताना गरिबांना न्याय देण्याची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त करून शेवटपर्यंत सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले. उपशिक्षणाधिकारी श्रीराम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. संदीप राठोड, अमितकुमार राठोड व त्यांचे आई-वडील भरत राठोड व छाया राठोड यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अ‍ॅड. बद्रीप्रसाद चव्हाण, अ‍ॅड. एस.एफ. राठोड, भाऊराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी शंकर बावस्कर, माहिती अधिकारी अनिल ठाकरे आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.