Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अनावश्यक बंधनांमुळे विद्यापीठांची कोंडी - डॉ. कोळस्कर
नगर, ७ जून/प्रतिनिधी

 

सध्याची विद्यापीठे ही फक्त परीक्षा घेणारी केंद्रे झाली आहेत. संशोधनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यापीठांची, उच्चशिक्षणाची अधोगती झाली. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातसारखी राज्ये प्रगतिपथावर जात असताना उच्चशिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे पडला. विद्यापीठांवर नियंत्रण ठेवणाऱ्या १४ संस्था रद्द करून एकच नियामक संस्था अस्तित्त्वात येणे गरजेचे आहे. या संस्थांची अनावश्यक बंधने रद्द केल्यास विद्यापीठे मुक्तपणे कार्य करू शकतील, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर यांनी केले.
पुणे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्ष २००८-०९निमित्त सोसायटी, दैनिक लोकसत्ता व यशवंतराव चव्हाण व्यासपीठच्या वतीने सहकार सभागृहात आयोजित ‘उच्चशिक्षणाची दशा आणि दिशा’ या परिसंवादात मार्गदर्शन करताना डॉ. कोळस्कर बोलत होते. ‘व्यासपीठ’चे अ‍ॅड. रामनाथ वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोसायटीचे अध्यक्ष
डॉ. गजानन एकबोटे, ‘लोकसत्ता’चे आशिष पेंडसे, प्राचार्य खासेराव शितोळे, गोसावी, जगदीश चिंचोले, प्राचार्य झावरे व्यासपीठावर उपस्थित होते.
उच्चशिक्षणाला दिशा देण्यासाठी वृत्ती बदलणे आवश्यक आहे. विद्यापीठांची धोरणे लवचिक व्हायला हवीत. विद्यार्थ्यांनीही उच्चशिक्षणासाठी सरकारवर अवलंबून न राहता तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक ज्ञान थेट तज्ज्ञांकडून संपादन करावे. शिक्षणपद्धतीत काळानुरूप बदल केले जावेत. उच्चशिक्षितांची संख्या लोकसंख्येच्या मानाने कमी असली, तरी या वाढत्या संख्येनुसार सरकारने अधिक निधी उच्चशिक्षणासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही डॉ. कोळस्कर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची सर्वागीण प्रगती होऊ शकेल, असा अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत, अभ्यासक्रमात काळानुरूप बदल केले गेले पाहिजेत. शिक्षकांचा दर्जा खालावला असल्यामुळे शिक्षकांचे मूल्यांकन करण्याची पद्धत सुरू करावी. त्यांना शिकविण्याचे प्रशिक्षण दिले जायला हवे. अभ्यासक्रम तयार करताना शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, प्रतिनिधी, उद्योजकांच्या मतांचा विचार प्रामुख्याने व्हावा, असे आग्रही मतही डॉ. कोळस्कर यांनी मांडले.
डॉ. एकबोटे म्हणाले की, गेल्या ६० वर्षांत देशात उच्चशिक्षणाची केवळ संख्यात्मक प्रगती झाली. लहान आकाराची विद्यापीठे ही गरज झाली आहे. जुनाट परीक्षापद्धतीत बदल झाला पाहिजे. ग्रामीण भागापर्यंत उच्चशिक्षण पोहोचले पाहिजे. सध्या उच्चशिक्षण देणाऱ्या ८० टक्के संस्था मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांत आहेत. या संस्थांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.
प्राचार्य झावरे, पेंडसे, शितोळे, गोसावी, स्वप्नील फुंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. वायकर यांच्या ‘महाराष्ट्र गीता’ने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. श्रीमती उगले यांनी सूत्रसंचालन केले.