Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दोन्ही काँग्रेसने एकत्र लढावे - कृपाशंकर सिंग
राहाता, ७ जून/वार्ताहर

 

मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने विधानसभा निवडणूक एकत्र लढवावी, असे मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी सांगितले.
साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कृपाशंकर सिंग म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले काँग्रेससोबतच असून, त्यांचा पराजय हा दुर्दैवी आहे. पक्ष त्यांचा योग्य सन्मान करील. आठवलेंच्या पराभवावर भाष्य करण्यास नकार देत श्री. सिंग यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेच बोलू शकतील, असे सांगितले. मुंबईतील सन २०००पर्यंतच्या झोपडय़ा नियमित करण्याबाबत लवकरच कार्यवाही होईल. त्यासंदर्भात आपला पाठपुरावा सुरू आहे.
मुंबई व राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आपण मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आदींची भेट घेऊन मुंबई व महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे. सरकारने मुंबईसाठी सव्वीस हजार कोटींचे पॅकेज मंजूर केले. आतापर्यंत त्यातील बारा हजार कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, या निवडणुकीच्या यशानंतर आम्ही आता मुंबईच्या विकासासाठी आणखी बत्तीस हजार कोटींची मागणी केली आहे.
शिर्डीला सर्व पक्षांचे नेते साईदर्शनासाठी येतात. विजयासाठी साकडे घालतात. मात्र, शिर्डीच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात. येथे यायला रस्ते धड नाहीत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. बायपासचे काम तर बंदच आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, आपण हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करू. त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. सन २०१८मध्ये होणाऱ्या साईबाबांच्या समाधीच्या शतकपूर्ती महोत्सवास मोठा निधी मिळवून देण्याचेही त्यांनी याच वेळी सांगितले. दर्शनानंतर संस्थानच्या वतीने त्यांचा जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी सत्कार केला.