Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पावसामुळे सुखद गारवा
नगर, ७ जून/प्रतिनिधी

 

मान्सूनपूर्व पावसाने आजही नगर शहरासह जिल्ह्य़ाच्या विविध भागांत हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेले काही दिवस उकाडय़ाने हैराण झालेल्या नगरकरांना या पावसामुळे सुखद गारवा अनुभवायास मिळाला. आज सकाळी व दुपारी चांगले ऊन पडले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नगरकरांना या पावसाने चिंब भिजवले. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. सखल भागात तळे साचले. पावसाचा आनंद लहान मुलांनीही लुटला. वाहनचालक, पादचाऱ्यांची मात्र पावसाने त्रेधातिरपीट उडवली.
शहरातील रस्ते मनपाने पावसाळ्यापूर्वी दुरुस्त न केल्याने रस्त्यावरील खड्डे त्रासदायक ठरत आहेत. दिल्ली दरवाजा ते नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रस्ता, अमरधाम रस्ता यासह अन्य रस्त्यांवर असंख्य खड्डे असल्याने आणि त्यातच पावसाची भर पडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. सुडकेमळा येथे रस्त्यातील खड्डय़ाचा अंदाज न आल्याने एक दाम्पत्य स्कूटर घसरून पडले. काल रात्री शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ वीज पडल्याने कार्यालयातील दूरचित्रवाणी संच व दिवे जळाले.
पावसाने चांगली सुरुवात केली असल्याने शेतकरी आता मुगाच्या पेरणीसाठी तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने शेतातील कामांना वेग आला आहे.