Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यात युतीची सत्ता आणणारच - मुंडे
पाथर्डी, ७ जून/वार्ताहर

 

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे सारथ्य आपण करू, असे सांगतानाच राज्यात युतीची सत्ता आणण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करू, असा विश्वास खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला.
खासदार मुंडे व खासदार दिलीप गांधी यांचा भगवानगडावर गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मुंडे बोलत होते. या वेळी मुंडे यांची पेढेतुला करण्यात आली. व्यासपीठावर आमदार सर्वश्री. अनिल राठोड, सदाशिव लोखंडे, अमरसिंह पंडित, पंडितअण्णा मुंडे, धनंजय मुंडे, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, विठ्ठल लंघे, कुंडलिक जगताप, पंकजा पालवे, शिवाजी काकडे उपस्थित होते.
मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी चांगली दाद दिली. श्री. मुंडे म्हणाले की, बीडच्या यशानंतर आशीर्वाद घेण्यासाठी आपण गडावर आलो आहोत. भगवानबाबांच्या आशीर्वादाने आपण संसदेत निवडून गेलो. ज्या वर्गात मी जन्मलो, त्या वर्गाच्या वेदना मी संसदेत मांडणार आहे. शोषित, दुर्बल, उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली, तरीही या वर्गाला न्याय मिळालेला नाही. यात परिवर्तन करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे. आतापर्यंत जी जबाबदारी घेतली, ती ‘रेकॉर्डब्रेक’ पार पाडली. खासदार म्हणूनही अशीच कामगिरी बजावू. मी शेतकरी कुटुंबात जन्मलो. लहानपणी वडिलांचे निधन झाल्याने आई व पंडितअण्णांनी आपल्याला वाढवले. आज संसदेत पोहोचलो ही बाबांची कृपा आहे. मी लोकसभा लढवणार की नाही, यावर बरीच चर्चा झाली. मात्र, बोलायचे एक अन् करायचे दुसरेच असे वागणारा मी बारामतीकर नाही, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. एक विजय मिळाला असला, तरीही आणखी एक विजय मिळवायचा आहे. दसऱ्यानंतर हा विजय मिळवूच. विधानसभा निवडणुकीचे आपण सारथ्य करणार आहोत. भगवानगडाच्या विकासासाठी सर्वानीच मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी बोलताना गांधी म्हणाले की, मी मुंडेंच्या आशीर्वादाने खासदार झालो. मुंडे ज्यांच्यावर विश्वास टाकतात, त्यांचे कल्याण होते. खऱ्या अर्थाने आधार देणारे ते एकमेव नेते आहेत. गडाच्या विकासासाठी ते सांगतील, तेवढा खासदार निधी आपण देऊ.
पंकजा पालवे यांनी खासदार कसा असतो, ते मुंडे दाखवून देतील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी जि. प. सदस्य मोहन पालवे, भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ शर्मा, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, तालुकाप्रमुख रफिक शेख, भाजप तालुकाध्यक्ष रामनाथ बंग, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल बडे, नगरसेवक दिनकर पालवे, राम सुद्रुक, डॉ. दीपक देशमुख, डॉ. मृत्युंजय गर्जे उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी केले.