Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

श्रीगोंद्यासह पिंपळगावला वादळामुळे मोठे नुकसान
विसापूर भागात महिला जखमी
श्रीगोंदे, ७ जून/वार्ताहर

 

तालुक्यात शनिवारी झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका श्रीगोंदे शहर व पिंपळगाव पिसे गावाला बसला. शहरात सुमारे १५० घरांची पडझड झाली, तर पिंपळगाव पिसे येथील कुकडी कारखान्याची २९ हजार ७८१ साखर पोती भिजून इमारतीवरील ३४० पत्र्यांचे नुकसान झाले. तेथीलच २४ हेक्टर डाळिंब व अडीच हेक्टर केळी बागांचे नुकसान झाले. दरम्यान, आज दुपारी पुन्हा विसापूर परिसराला वादळाचा तडाखा बसला. यात एक महिला जखमी झाली.
शनिवारी झालेल्या वादळात तालुक्यात मोठे नुकसान झाले. प्रभारी तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांनी महसूल यंत्रणेला त्वरित पंचनाम्याचे आदेश दिले. आज दिवसभर पंचनाम्याचे काम सुरू होते. नुकसानीबाबत अंतिम माहिती हाती आली नसली, तरी शहरातील १५० घरांची पडझड झाल्याची माहिती समजली. सिद्धार्थ-ससाणेनगर, इंदिरानगरमधील झोपडपट्टी, पंचायत समिती कर्मचारी वसाहत, ग्रामीण रुग्णालय परिसर या भागातील घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. शहराच्या बहुतेक भागातील विजेचे खांब, झाडे पडली.
पिंपळगाव पिसे परिसरात सलग दोन दिवस वादळाचा तडाखा बसला. कालच्या वादळात कुकडी सहकारी साखर कारखान्याची ताडपत्रीखाली झाकून ठेवलेली २९ हजार ७८१ साखर पोती भिजल्याने कोटय़वधींचे नुकसान झाले. कारखाना इमारतीवरील ३४० पत्रे उडून गेले, तर काही फुटले. कारखान्याच्या रासायनिक खतांच्या गोण्याही भिजल्या. आजही पुन्हा झालेल्या वादळात कामगार वसाहतीतील ५-६ खोल्यांवरील पत्रे उडाले. यात प्रसुतीसाठी आलेली अर्चना विशाल महाले (वय २७) ही महिला जखमी झाली. या महिलेचे वडील कारखाना कर्मचारी आहेत.
कारखान्यावर हे नुकसान झाले असतानाच पिंपळगाव पिसे येथील प्रमोद जगताप, किशोर पंधरकर, जालिंदर कदम आदी शेतकऱ्यांचे २४ हेक्टर डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. तेथीलच सुभाष कदम व श्री. सपाटे यांच्या अडीच हेक्टरवरील केळीचे मोठे नुकसान झाले, तर भिल्ल समाजातील ५ कुटुंबांच्या झोपडय़ा वादळात उडून गेल्याने ते उघडय़ावर आले. तलाठी श्री. बनकर यांनी ही माहिती दिली. वीज पडून काही गावांमध्ये जनावरेही दगावली. मात्र, निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आपदग्रस्त भागास आज वनमंत्री बबनराव पाचपुते व राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांनी स्वतंत्र भेटी देऊन पाहणी केली. पाचपुते यांच्यासोबत तहसीलदार कोळी होते.
तालुक्यातील विसापूर, पिंपळगाव, बेलवंडी, घारगाव, लोणी भागात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस झाला, तर इतर काही गावांमध्ये संततधार पाऊस होता.