Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कांद्याचे लिलाव बंद पाडून श्रीरामपूरला ‘रास्ता रोको’
कमी भावामुळे शेतकरी संतप्त
श्रीरामपूर, ७ जून/प्रतिनिधी

 

भाव पडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कांद्याचे लिलाव बंद पाडून रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीचे सभापती, तसेच पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कांद्याला दोन दिवसांपूर्वी एक हजार रुपये भाव निघाला. ढगाळ हवामानामुळे आज शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कांदा बाजारात आणला. ठराविक कांद्याचा भाव वगळता इतर कांद्यास सरासरी सहाशे ते सातशे रुपये भाव निघाला. शेतकऱ्यांनी यास विरोध केला. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी नेवासे रस्त्यावर रास्ता रोको केला. सुमारे तासभर आंदोलन सुरू होते.आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. बाजार समितीचे सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे यांनी शेतकऱ्यांना भेटून त्यांची समजूत काढली. काल नऊशे ते हजार रुपये भाव मिळाला. मात्र, आज कमी भाव मिळाल्यानेच रास्ता रोको केला. पोलिसांनी, तसेच पवार व पटारे यांनी समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यानंतर कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले. फेरलिलावतही भावात वाढ न झाल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. सर्वश्री. संजय पवार, रवींद्र पवार, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल गवळी, अशोक दुशिंग, संजय तांबे, शिवाजी गायकवाड आदींनी आंदोलनात भाग घेतला.