Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘विजय’पर्वाला सुरुवात!

 

जिल्ह्य़ाचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून विजय चव्हाण आज (सोमवारी) पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. आयपीएस असलेल्या चव्हाण यांच्या नावातच ‘विजय’ आहे. त्यामुळे दुष्ट शक्तींवर सज्जनांचा विजय होणार असे समजण्यास हरकत नाही!
पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक म्हणून मुंबईला गेले. त्यांची सुमारे दोन वर्षांची कारकीर्द तशी सुरळीत पार पडली. आक्रमक शैलीऐवजी त्यांनी सामोपचाराचा प्रामुख्याने अवलंब केला. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक राहत नाही, असेही बोलले जायचे. तथापि, गुन्ह्य़ांचा तातडीने शोध घेण्यात डोंगरे यांना यश आले. त्यांच्या काळातील बऱ्याचशा गुन्ह्य़ांची उकल झाली. फारशी वादग्रस्त न होता डोंगरे यांची ‘इनिंग’ संपली.
डोंगरे यांनी आधीचे अधीक्षक सुनील रामानंद यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा वाढते दरोडे हे आव्हान त्यांच्यासमोर होते. ते त्यांनी पेलले. सराफी पेढय़ा लुटणाऱ्या दरोडेखोरांपैकी ४०जणांना अटक करण्यात आली. काल्या या खतरनाक दरोडेखोरास गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे येथे जेरबंद केले. सूत्रधार नांगऱ्या मात्र हाती लागू शकला नाही, ही खंत डोंगरे यांना आहे.
कापूरवाडीचे संध्या म्हस्के खून प्रकरण, श्रीगोंदे येथील एक कोटीचा दरोडा, नगर शहरातील मुनोत दाम्पत्य खून प्रकरण, सोनई येथील खूनसत्र ही प्रकरणे खूप गाजली. गुन्हे शाखेच्या मदतीने डोंगरे यांनी या प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्यात यश मिळवले. नगरचा मोहरम, गणेशोत्सव, महापालिका व लोकसभा निवडणुका नियोजनबद्धपणे हाताळल्याने शांततेत पार पडल्या.
नवे अधीक्षक विजय चव्हाण यांच्यापुढे दरोडेखोरांचे फारसे आव्हान नाही. चांदे येथील अंबिका डुकरे या महाविद्यालयीन तरुणीच्या खून प्रकरणातील आरोपी तीन वर्षांपासून पोलिसांना सापडलेला नाही. नगर शहरातील मंगळसूत्र चोरांचा हैदोस पोलिसांना आव्हान देऊ लागला आहे. अनेक महिन्यांपासून मंगळसूत्र चोरांची टोळी पोलिसांना चकवत आहे. जिल्ह्य़ातील वाळू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. घरफोडय़ांचे प्रमाणही लक्षणीय आहे. नगर जिल्हा राजकीयदृष्टय़ा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा समजला जातो. येथील राजकीय भांडणे, त्यातून होणारी आंदोलने याचाही विचार नव्या अधीक्षकांना करावा लागणार आहे.
नगर शहरातील, प्रामुख्याने तोफखाना ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले आहे. मंगळसूत्र चोऱ्या, घरफोडय़ा, खून, बलात्कार यामुळे सावेडी परिसरात भीतीचे वातावरण आहे. हे थांबविण्यासाठी चव्हाण यांना पावले उचलावी लागतील. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीचा प्रश्न धूळखात पडला आहे. पोलीस वसाहतीमधील विकासाचे प्रश्न त्यांना सोडवावे लागतील. शिर्डी, शनिशिंगणापूरच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे लागेल. याशिवाय पोलीस दलाची पुनर्रचना, कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
चव्हाण दहा वर्षांपूर्वी नगरला अतिरिक्त अधीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यामुळे येथील पाश्र्वभूमी त्यांना नवी नाही. असे असले, तरी दहा वर्षांत शहरांना विस्तार झाला. गुन्हेगारीही वाढली. नगरनंतर काही दिवस चव्हाण पुण्यास होते. नंतर त्यांनी दहशतवाद विरोधी पथकात काम केले. सन २००५मध्ये त्यांनी धुळ्याला पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. त्याच वर्षी त्यांना भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) दर्जा मिळाला. हिंगोली येथे काही काळ काम केल्यावर ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. नगरमधील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा!
कैलास ढोले
kailas_dhole@rediffmail.com