Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वडील पाखंडी होते काय?

 

कधी काळी आमच्या घराण्यात १७ गावांची पाटीलकी असावी. अगदी अलीकडेपर्यंत आम्हाला पंचक्रोशीतील लोक ‘सतरा गावचे पाटील’ म्हणून संबोधत. एकेकाळी जिल्ह्य़ाला ‘परगणा’ म्हणायचे. परगण्याचा प्रमुख पाटील आणि त्याचा लेखनिक अधिकारी कुलकर्णी असायचा. धांदरफळ परगण्याचे ठिकाण. प्रमुख म्हणून आमच्या वाडवडिलांनी प्रवरेया पैलतिरावर एक मोठा राजवाडय़ासारखा वाडा बांधला होता. लहानपणी त्याच्या खाणाखुणा मी पाहिल्या आहेत. काळ जसा पुढे जातो तशी सत्तासंपत्तीही बदलत जाते, असा जणू नियमच आहे. आमच्या घराण्याचेही तसेच झाले.
पाटलांचा एकच वाडा असला, तरी त्यांचे सेवेकरी, शेतजमिनीचे कुळ, नोकर वगैरे आणि पाटील घराण्यातील वाढती लोकसंख्या यामुळे एक छोटे गाव तयार झाले. त्यालाच धांदरफळ खुर्द म्हणतात. काळाच्या ओघात वैभव गेले. सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही असे म्हणतात, तसेच आमच्या वाडवडिलांचे झाले असावे. याला माझे वडीलही अपवाद नव्हते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात, चालण्यात, जीवनपद्धतीत ते प्रखरतेने जाणवायचे.

तेव्हा गावात एक हनुमान मंदिर होते. वडील या मंदिरात बसून उन्हाळ्याच्या दिवसात शेतसारा वसूल करीत. मारुतीच्या मूर्तीकडे पाठ करून गोपुरास खेटून ते बसायचे. बहुतेक शेतकरी अशिक्षित असल्याने ते साऱ्याची रक्कम वडिलांसमोर ठेवत. वडील त्यातील साऱ्याची रक्कम मोजून काढून घेत. बाकी रक्कम शेतकऱ्याला परत करीत. कुलकण्र्याकडे रक्कम देऊन पावती दिल्याची खात्री करीत. मगच पुढच्या शेतकऱ्याचा सारा घेत. यात बराच वेळ जायचा. आलेल्या शेतकऱ्याला वाटायचे आलोच आहे तर मारुतीचे दर्शन घेऊन जाऊ. दर्शन घ्यायचे म्हणजे आतील छोटय़ा देवालयाला (गोपुराला) वळसा घालायचा. पण ते तसे कसे करणार? वडील मूर्तीकडे पाठ करून शेजारीच बसलेले. त्यांच्या समोरून वळसा घालण्याची शेतकऱ्यांची हिंमतच नसायची. त्यामुळे आपसात कुजबूज सुरू व्हायची. पाटील म्हणजे पक्के पाखंडी, देवावर त्यांचा भरवसाच नाही वगैरे वगैरे. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
त्या वेळी गावात भांडण तंटे वगैरे फारसे होत नसत, पण झालेच तर ते वडिलांच्या दरबारात मिटत. त्यांच्या हयातीत सावकारी व्यवहाराशिवाय इतर एकही दिवाणी वा फौजदारी खटला कोर्ट-कचेरीत गेल्याचा पुरावा नाही. ते गुन्हेगाराला शिक्षा द्यायचे ती मारुतीच्या मंदिरात. महिनाभर दिवा लाव, महादेवाच्या मंदिराची झाडलोट कर अशा शिक्षेमुळे देवावर लोकांची श्रद्धा बसायची. त्यामुळे त्यांच्या गळ्यात पाखंडी म्हणून घंटा बांधण्याची हिम्मत लोक करीत नसत.
एकदा आमचे कुलकर्णी आणि त्यांचे बंधू वडिलांकडे आले. दोघे सख्खे भाऊ, पण दोघांचे सूतभर जमायचे नाही. दोघेही भांडण झाले की अर्वाच्च भाषेत लाखोली वहायचे. दोघेही धांदरफळ बुद्रुकला शेजारी शेजारी रहायचे. त्या दिवशी प्रकरण हातघाईवर आले. एकमेकांची डोकी फुटली. हे भांडण मिटवण्यासाठी दोघेही वडिलांकडे आले. दोघांची बाजू ऐकून वडिलांनी दोघांनाही दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली. गावापासून दोन फर्लागावर एक, तर दुसरे सुमारे दीड मैलावर दक्षिणेस इनामी अशी दोन महादेवीची मंदिरे आहेत. शिक्षा अशी होती की एकाने सायंकाळी देवळात दिवा लावायचा आणि दुसऱ्याने ते झाडून साफ करायचे. दोघेही नीट काम करतात की नाही हे तेथील नेमणुकीस असलेला गोसाव्याने लक्ष ठेवून चूक झाल्यास वडिलांच्या नजरेस आणून द्यायची. आता दोघाही बंधूंना दररोज जवळपास दोन मैल अंतर जावे लागायचे. हळूहळू दोघांनाही समज आली. भांडण मिटले. त्यांचे भांडण मिटले, मात्र त्यातून माझ्यावर आपत्ती आली. आमचे कुलकर्णी दर वर्षी चातुर्मासात सहकुटुंब पंढरपुरी जात. ते साल होते १९३२. गावकीचे भांडण मिटले म्हणून आनंदाच्या भरात मलाही पंढरपुरी घेऊन जाण्याची इच्छा त्यांनी वडिलांकडे प्रकट केली. चार महिने शाळा बुडणार हे माहीत असूनही वडिलांनी परवानगी दिली. कुलकर्णी अप्पा, त्यांची पत्नी, एक विधवा स्त्री व एक माझ्याच वयाची लहान मुलगी असे पाचजण आम्ही पंढरपुरात एका बडव्याच्या घरी राहिलो. मी व ती मुलगी आम्ही रोज रांगेत उभे राहून व इतरही अनेक वेळा विठोबा माऊलीचे दर्शन घेत असू. त्या चार महिन्यांत अप्पांचे कुटुंब मला वेगळे बसवून जेवू घालत. त्यात मलाही काही वावगे वाटले नाही. पण अकस्मात मला तीन-चार दिवस ताप आला. तो काही केला उतरेना. अप्पा घाबरले. वडिलांना काय कळवावे. पाटीलांच्या उत्तराधिकाऱ्याचे बरे-वाईट झाले तर काय, या प्रश्नाने त्यांचे डोके गरगरू लागले. ही बातमी वडिलांना समजली. ते पंढपुरी यायला निघाले. अप्पा अधिकच घाबरले. काय व्हायचे ते होईल असे म्हणून त्यांनी मला पाठिशी घेतले आणि माऊली, माऊली म्हणून चंद्रभागेच्या थंड पाण्यात उडी घेतली. काहीतरी चमत्कार घडल्यासारखे झाले. माझा ताप उतरला. अप्पांचा समज झाला हे सर्व विठ्ठलाच्या कृपेने घडले. वडील आले. अप्पांनी त्यांना सर्व सांगितले. तेव्हापासून अप्पांचा जीवनक्रम बदलला. दैनंदिन कर्मकांड बंद झाले. स्पृश्य-अस्पृश्य भेद बंद झाले. ते सर्व जाती-जमातीत मिसळून जेवणखान एकत्र करू लागले.
माझा ताप बुडी मारल्याने उतरला की इतर काही शास्त्रीय कारणाने हे एक कोडे आहे. अलीकडे अनेक डॉक्टर तापाच्या रुग्णांना अक्षरश थंड पाण्याने स्नान घालतात. असो. पंढरपूरला जाण्यापूर्वी घरातील देवांची पूजा मी मनोभावे करीत असे. त्यांचा आशीर्वाद मागत असे. मी पंढरपूरहून आलो तोपर्यंत घरातील देवांची पूजा कोणीच केली नव्हती. देव धुळीने काळे-निळे झाले होते. मी देव्हारा साफ केला. देव ताम्हणात घेऊन स्वच्छ केले. देव्हाऱ्यात नीट ठेवले. त्यांना गंध लावावे म्हणून देव्हाऱ्याच्या खालच्या भागातील देवळीतील चंदनाचा गोळा बाहेर काढावा म्हणून तिथे हात घातला तर विंचवाने डंख मारला. वेदनांनी हैराण झालो. वडिलांनी विंचवाला ठेचला आणि देव्हाराही फेकून दिला. तांबडय़ा फडक्यात देव गुंडाळले आणि आईला बोलावून ते तिच्या हवाली केले. आणि सांगितले ‘तुला होणाऱ्या मुलाच्या लग्नात म्हणून तू हे देव जपून ठेव. पुन्हा देव्हाऱ्यात ठेवू नकोस. याला त्यांची पूजा करायला लावू नकोस. देवादिकांवर माझा मुळीच विश्वास नाही.’ वडील असे का बोलतात, का वागतात हे मला समजेना.
मी पाच-दहा वर्षांचा असताना त्यांनी गावच्या बाबूराव मुळेंकडे एक काम सोपवले होते. दर वर्षी श्रावणात सकाळ-संध्याकाळ एकेक तास महादेवाच्या देवळात माझ्या हस्ते अभिषेक करायचा. मी चांगला १३-१४ वर्षांचा झालो तोपर्यंत हा कार्यक्रम चालला होता. हात सारखा ताठ ठेवायचा. पाण्याची धार पिंडीवर सारखी पडावी म्हणून भांडे हाती धरायचे. मुळ्यांचे संस्कृत भाषेतील तेच तेच शब्द परत परत ऐकून मला श्रावण महिना आला की सगळे नकोसे वाटायचे. पण उपाय नव्हता. वडिलांचा राग यायचा. ते स्वत देवाला कधी नमस्कार करायचे नाहीत. देव्हारा फेकून देत. देवाकडे पाठ फिरवून बसत. मग माझ्यावर अभिषेकाची सक्ती का? ते असे अनाकलनीय का वागतात हे समजेनासे झाले होते. एक दिवस मन बंड करून उठले व त्यांना प्रश्न करते झाले. ‘तुम्ही देवाच्या बाबतीत इतके विसंगत वागता व त्याची सक्ती माझ्यावर का करता?’ ते थोडा वेळ शांत बसले. मला जवळ घेऊन म्हणाले, ‘अरे देव ना देवळात, ना तो दगडात. असलाच तर तो सर्व ठिकाणी आहे. कर्मकांडात देव नाही. खऱ्या धर्माच्या नावाखाली पोटभरू कर्मकांड मला मान्य नाही.’ यावर मी म्हणालो, ‘मग तुम्ही देवळात दिवा लाव, मंदिर झाड असं का सांगता?’ ते म्हणाले, ‘कर्मकांडाच्या आधारे खरा धर्म म्हणजे कर्तव्य शिकवण्यासाठी!’
आमच्या घरी आजोबांचे वर्षश्राद्ध व दसऱ्याचा उत्सव कधीच होत नसे. पाटील म्हणून मात्र बाहेर अशा उत्सवात वडील सामील होत. असे का हे मला माझे लग्न झाल्यावर समजले. विवाहानंतर त्यांनी आईला सांगितले, घरात दसऱ्याचा सण करीत जा. कारण समजले. त्यांचे वडील दसऱ्याच्या दिवशी वारले होते. वर्षश्राद्ध करण्याऐवजी ते त्या दिवशी कडक उपास करीत. त्यामुळे घरात सणाच्या दिवशी गोडधोड होत नसे. म्हणाले मी जिवंत आहे आता. सणाचे उपचार करायला काहीच हरकत नाही.
आता मला समजले वाणीविलास, लिखाण, वाचन पांडित्य ही हुशारी असेल, परंतु ती उपजत बुद्धी नाही. खेडय़ात जन्मलेले अल्पशिक्षित असलेले माझे वडील हुशार नसतील, पण बुद्धिमान अवश्य होते.