Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

अनावश्यक बंधनांमुळे विद्यापीठांची कोंडी - डॉ. कोळस्कर
नगर, ७ जून/प्रतिनिधी

सध्याची विद्यापीठे ही फक्त परीक्षा घेणारी केंद्रे झाली आहेत. संशोधनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यापीठांची, उच्चशिक्षणाची अधोगती झाली. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातसारखी राज्ये प्रगतिपथावर जात असताना उच्चशिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे पडला. विद्यापीठांवर नियंत्रण ठेवणाऱ्या १४ संस्था रद्द करून एकच नियामक संस्था अस्तित्त्वात येणे गरजेचे आहे. या संस्थांची अनावश्यक बंधने रद्द केल्यास विद्यापीठे मुक्तपणे कार्य करू शकतील, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर यांनी केले.

दोन्ही काँग्रेसने एकत्र लढावे - कृपाशंकर सिंग
राहाता, ७ जून/वार्ताहर

मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने विधानसभा निवडणूक एकत्र लढवावी, असे मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी सांगितले. साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कृपाशंकर सिंग म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले काँग्रेससोबतच असून, त्यांचा पराजय हा दुर्दैवी आहे. पक्ष त्यांचा योग्य सन्मान करील. आठवलेंच्या पराभवावर भाष्य करण्यास नकार देत श्री. सिंग यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेच बोलू शकतील, असे सांगितले. मुंबईतील सन २०००पर्यंतच्या झोपडय़ा नियमित करण्याबाबत लवकरच कार्यवाही होईल. त्यासंदर्भात आपला पाठपुरावा सुरू आहे.

राज्यात युतीची सत्ता आणणारच - मुंडे
पाथर्डी, ७ जून/वार्ताहर

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे सारथ्य आपण करू, असे सांगतानाच राज्यात युतीची सत्ता आणण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करू, असा विश्वास खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला. खासदार मुंडे व खासदार दिलीप गांधी यांचा भगवानगडावर गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मुंडे बोलत होते. या वेळी मुंडे यांची पेढेतुला करण्यात आली. व्यासपीठावर आमदार सर्वश्री. अनिल राठोड, सदाशिव लोखंडे, अमरसिंह पंडित, पंडितअण्णा मुंडे, धनंजय मुंडे, भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, विठ्ठल लंघे, कुंडलिक जगताप, पंकजा पालवे, शिवाजी काकडे उपस्थित होते.

पावसामुळे सुखद गारवा
नगर, ७ जून/प्रतिनिधी

मान्सूनपूर्व पावसाने आजही नगर शहरासह जिल्ह्य़ाच्या विविध भागांत हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेले काही दिवस उकाडय़ाने हैराण झालेल्या नगरकरांना या पावसामुळे सुखद गारवा अनुभवायास मिळाला. आज सकाळी व दुपारी चांगले ऊन पडले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नगरकरांना या पावसाने चिंब भिजवले.

श्रीगोंद्यासह पिंपळगावला वादळामुळे मोठे नुकसान
विसापूर भागात महिला जखमी
श्रीगोंदे, ७ जून/वार्ताहर

तालुक्यात शनिवारी झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका श्रीगोंदे शहर व पिंपळगाव पिसे गावाला बसला. शहरात सुमारे १५० घरांची पडझड झाली, तर पिंपळगाव पिसे येथील कुकडी कारखान्याची २९ हजार ७८१ साखर पोती भिजून इमारतीवरील ३४० पत्र्यांचे नुकसान झाले. तेथीलच २४ हेक्टर डाळिंब व अडीच हेक्टर केळी बागांचे नुकसान झाले. दरम्यान, आज दुपारी पुन्हा विसापूर परिसराला वादळाचा तडाखा बसला. यात एक महिला जखमी झाली.

कांद्याचे लिलाव बंद पाडून श्रीरामपूरला ‘रास्ता रोको’
कमी भावामुळे शेतकरी संतप्त
श्रीरामपूर, ७ जून/प्रतिनिधी

भाव पडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज कांद्याचे लिलाव बंद पाडून रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीचे सभापती, तसेच पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कांद्याला दोन दिवसांपूर्वी एक हजार रुपये भाव निघाला. ढगाळ हवामानामुळे आज शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर कांदा बाजारात आणला.

‘विजय’पर्वाला सुरुवात!
जिल्ह्य़ाचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून विजय चव्हाण आज (सोमवारी) पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. आयपीएस असलेल्या चव्हाण यांच्या नावातच ‘विजय’ आहे. त्यामुळे दुष्ट शक्तींवर सज्जनांचा विजय होणार असे समजण्यास हरकत नाही!
पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक म्हणून मुंबईला गेले. त्यांची सुमारे दोन वर्षांची कारकीर्द तशी सुरळीत पार पडली. आक्रमक शैलीऐवजी त्यांनी सामोपचाराचा प्रामुख्याने अवलंब केला. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक राहत नाही,

वडील पाखंडी होते काय?
कधी काळी आमच्या घराण्यात १७ गावांची पाटीलकी असावी. अगदी अलीकडेपर्यंत आम्हाला पंचक्रोशीतील लोक ‘सतरा गावचे पाटील’ म्हणून संबोधत. एकेकाळी जिल्ह्य़ाला ‘परगणा’ म्हणायचे. परगण्याचा प्रमुख पाटील आणि त्याचा लेखनिक अधिकारी कुलकर्णी असायचा. धांदरफळ परगण्याचे ठिकाण. प्रमुख म्हणून आमच्या वाडवडिलांनी प्रवरेया पैलतिरावर एक मोठा राजवाडय़ासारखा वाडा बांधला होता. लहानपणी त्याच्या खाणाखुणा मी पाहिल्या आहेत. काळ जसा पुढे जातो तशी सत्तासंपत्तीही बदलत जाते, असा जणू नियमच आहे. आमच्या घराण्याचेही तसेच झाले.

‘विशेष कार्यकारी’ची यादी रखडली
नगर, ७ जून/प्रतिनिधी

महाविद्यालयीन प्रवेशासाठीची कागदपत्रे प्राधिकृत करून घेण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तयांची गरज वाढत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र या पदाची ५७जणांची यादी मागील ७ महिन्यांपासून रखडली आहे. ही यादी प्रलंबित असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एक यादी दिली आहे.

भंडारदरा धरणातून आवर्तन सुरू
राजूर, ७ जून/वार्ताहर

भंडारदरा धरणातून उन्हाळी हंगामासाठी व पिण्यासाठी आज सायंकाळी सातपासून आवर्तन सोडण्यात आले. १ हजार ३५३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात २ हजार १४४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. परंतु धरणातून १.३३ दशलक्ष घनफूट पाण्याची गळती होत आहे. तरीही गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी तब्बल एक टीएमसी पाणीसाठा जादा आहे. सन २००८मध्ये ९९८, २००७मध्ये याच दिवशी १ हजार ३०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. तुलनेत यावर्षी एक टीएमसी जादा साठा आहे. धरणातून सोडलेले पाणी कळसला २४, तर संगमनेरला ४० तासांत पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले.

कोल्हारमध्ये सराफी दुकान फोडले
कोल्हार, ७ जून/वार्ताहर

येथील बेलापूर रस्त्यालगत असलेल्या झुंबरशेठ कुंकूलोळ मार्केटमधील ‘गौरव ज्वेलर्स’ या सराफी दुकानाच्या शटर्सची कुलूपे तोडून अज्ञात चोरटय़ाने दुकानातील चांदीचे दागिने व मोड असा सुमारे चौदा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना काल रात्री घडली.संतोष भाऊसाहेब लोळगे यांच्या मालकीच्या ‘गौरव ज्वेलर्स’ या बंद दुकानाच्या शटरची कुलूपे तोडून अज्ञात चोरटय़ाने दुकानात प्रवेश केला. काचेच्या शोकेसमधील चांदीचे दागिने व मोड असा सुमारे १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या वेळी गल्ल्याचा ड्रावरही तोडून टाकला. देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवलेल्या देवतांच्या चांदीच्या मूर्तीना मात्र चोरटय़ांनी हात लावला नाही.
दरम्यान, आज सकाळी सात वाजता शेजारील ‘तनया व्हरायटीज’चे चालक रेवणनाथ गाढे दुकान उघडावयास आले असता त्यांच्या निदर्शनास हा चोरीचा प्रकार आला. त्यांनी त्वरित श्री. लोळगे यांना दुकानातील चोरीच्या घटनेची माहिती दिली.

शहर व उपनगरांना आज उशिरा पाणी
नगर, ७ जून/प्रतिनिधी

शहर व सर्व उपनगरांना उद्या (सोमवारी) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. मुळा धरणातील उपसा केंद्रावरील वीजपुरवठा आज दुपारी सव्वाचारपासून खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत तो सुरळीत झाला नाही. त्यामुळे पाणीउपसा बंद होता.परिणामी वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत पाण्याचा अपेक्षित साठा झाला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. वीजकेंद्राच्या दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीने दोन आठवडय़ांपूर्वीच ‘शटडाऊन’ घेतला होता. मात्र, त्यानंतरही थोडय़ाशाच पावसाने वीजपुरवठा खंडित झाला.

‘मुळा’चे आवर्तन सुरू
राहुरी, ७ जून/वार्ताहर
मुळा धरणामध्ये आजअखेर ४ हजार ७७६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून, धरणाच्या दोन्ही कालव्यांमध्ये ८९७ क्युसेकने पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मृतसाठा वगळता धरणात २७६ दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा शिल्लक असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याची चिन्हे आहेत. एकूण २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या ‘मुळा’तून १ मेपासून आजअखेर दोन्ही कालव्यांद्वारे पावणेसहा टीएमसी पाणी पिकांसाठी सोडण्यात आले. ४ हजार ५०० साठा हा मृतसाठा राखीव असल्याने या १ हजार ७५२ फुटाच्या पातळीवर एक फुटावर धरणाचा साठा ४ हजार ७७६ दशलक्ष घनफूट इतका शिल्लक आहे. कालव्यातील आवर्तन अद्यापि सुरू असले, तरी आवर्तनामुळे आणखी दोनच दिवसांत ‘मुळा’चा साठा मृतसाठय़ाची पातळी स्पर्श करेल. यंदा जून ७अखेर पातळी खालावल्याने धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील पावसाकडे लाभक्षेत्र व पाणलोटक्षेत्राचे लक्ष लागून आहे.

पाडाळणे कार्यालयात ‘डमी’ तलाठी
राजूर, ७ जून/वार्ताहर

महसूल खात्याच्या पाडाळणे येथील तलाठी कार्यालयामध्ये सात-बाराचे उतारे, दाखले घेण्यासाठी फार मोठय़ा अडचणींना सर्वसामान्य शेतकऱ्यांना वा खातेदारांना तोंड द्यावे लागत आहे.
तलाठी हे कार्यालयात कामकाजाच्या वेळी थांबत नाही. त्याऐवजी दुसरीच व्यक्ती कामकाज पाहण्यासाठी असते. त्यामुळे चिरीमिरीशिवाय उतारे मिळत नाहीत. शेतकऱ्यांची त्यामुळे कुचंबना होत आहे. नव्याने बदलून आलेल्या तहसीलदारांचा त्यांच्यावर अंकुश नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते किरण माळवे यांनी निवेदनात केला आहे. उताऱ्यासाठी घेण्यात आलेल्या पैशांची कार्यालयाकडून पावती मिळत नाही. चितळवेढा परिसरातून राजरोस वाळूची तस्करी होत आहे. रात्री २ पासून ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करीत असतात. हजारो रुपयांचा महसूल बुडत असताना या संदर्भात तहसील कार्यालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

‘उत्तमोत्तम वास्तूंमुळे शहराच्या वैभवात भर’
नगर, ७ जून/प्रतिनिधी
शहर विकासात वास्तू प्रकल्पांना फार महत्त्व असते. उत्तमोत्तम वास्तूंमुळे शहराच्या वैभवात भर पडते. या स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून हे कार्य अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कल्याण केळकर यांनी केले.‘एस्सा’च्या बेस्ट स्ट्रक्चर अॅवार्ड स्पर्धेचे पारितोषिक वितरण केळकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर दिनेश चंद्रात्रे (पुणे), प्रवीण गोयल, ‘एस्सा’चे अध्यक्ष अच्युत देशमुख, उपाध्यक्ष राजकुमार मुनोत, चंद्रमोहन हंगेकर, मधुकर बालटे उपस्थित होते.ए. एम. देशमुख अॅवार्ड मनोज नहार (टायटन शोरूम) यांना, तर अॅप्रिसिएशन अॅवार्ड फॉर इको फ्रेंडली कन्स्ट्रक्शन अॅवार्ड अजय दगडे (बिदे यांचा बंगला) यांना देण्यात आले. रेसिडेन्शिअल बंगला गटात सिद्धी कन्स्ट्रक्शन, ग्रुप हौसिंग गटात आशिष पोखरणा, कमर्शियल बिल्डिंग गटात शंकर बुचुडे विजेते ठरले.
भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल्स, जालना हे या पुरस्कारांचे प्रायोजक होते. श्रीकांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. बालटे यांनी आभार मानले.

‘बी-बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा’
नगर, ७ जून/प्रतिनिधी
शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते वेळेवर मिळण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घ्यावेत, तसेच काळाबाजार रोखण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे मंत्रिस्तरीय ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष कमाल फारुकी यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी फारुकी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित खात्याची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. आय. केंद्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी गुलाबराव खरात व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बी-बियाणांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. कृषी व पोलिसांचे संयुक्त पथके छापे घालत आहेत, असे केंद्रे यांनी सांगितले. ग्राहकांना घरपोच गॅस मिळण्यासाठी संबंधित एजन्सीबरोबर चर्चा करून ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावू, असे खरात यांनी सांगितले. ग्राहक संघटनेचे विलास जगदाळे, डॉ. विलास सोनवणे, सुरेश रुणवाल, वसंत दाबके, शिरीष बापट यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना केल्या.

बॉल बॅडमिंटन स्पर्धेत नगर जिल्ह्य़ाला अजिंक्यपद
नगर, ७ जून/प्रतिनिधी
राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशनतर्फे (कै.) दादासाहेब तनपुरे यांच्या स्मरणार्थ राहुरी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात नगर जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावले. सुवर्णपदक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विजेत्या संघाला गौरविण्यात आले. दि. ३ ते ५ जूनदरम्यान २१ वर्षे वयोगटात ही स्पर्धा झाली. नगर संघाने गडचिरोली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, अमरावती, वर्धा या संघांना हरवत विजयश्री मिळविली. स्पर्धेत २२ जिल्ह्य़ांतील मुलांचे व १३ मुलींच्या संघांनी भाग घेतला.मुलांच्या गटात नगर (प्रथम), वर्धा (द्वितीय), ठाणे (तृतीय) व चंद्रपूर (चौथा), तर मुलींच्या गटात अमरावती (प्रथम), ठाणे (द्वितीय), पुणे (तृतीय), नागपूर (चौथा) हे जिल्हा संघ विजेते ठरले. या सर्वाना माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले व नंदकुमार पवार यांच्या हस्ते व प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात आले. पंच म्हणून प्रीतम राऊत, सचिन वालदे, श्रीकांत जगताप, विनोद कराड, अमर चकोले यांनी काम पाहिले.

सर्व रिक्षाथांब्यांची लवकरच पुनर्रचना
नगर, ७ जून/प्रतिनिधी
शहरात बंदी असतानाही व्यवसाय करणाऱ्या ६ आसनी डिझेल रिक्षाचालकांनी शहर हद्दीबाहेर वाहतूक करावी, यासाठी लवकरच मोहीम राबवली जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे व शहर वाहतूक निरीक्षक तुकाराम वहिले यांनी ही माहिती दिली. शहरातील वाहतुकीस अवैध रिक्षांमुळे अडथळा निर्माण होत असल्याने सर्व रिक्षाथांब्यांचीही या मोहिमेत पुनर्रचना करण्यात येणार आहे. प्रामुख्याने जुन्या बसस्थानक चौकात फक्त रिक्षा व्यावसायिकांमुळे रोजच वाहतुकीची कोंडी होत असते. वाहतूक नियंत्रणासाठी तिथे नियुक्त केलेले वाहतूक शाखेचे पोलीस रोज ही कोंडी बघत असतात. मात्र, कोणीही त्यात हस्तक्षेप करत नाही. रस्त्याच्या मध्यभागी येऊन प्रवासी घेऊन जाण्यात ६ आसनी डिझेल रिक्षाचालक आघाडीवर असून त्यांनी या ठिकाणी आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. ३ आसनी रिक्षाचालकांनाही त्यांच्या अरेरावीचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो.

‘मौलाना आझाद महामंडळाचे २० कोटींचे कर्ज माफ करा’
नगर, ७ जून/प्रतिनिधी
मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे सुमारे २० कोटींचे कर्ज राज्य सरकारने माफ करावे, अशी मागणी मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांनी केली. राज्यात अल्पसंख्यांक मंत्रालयांतर्गत मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळ कार्यरत आहे. मुस्लिम समाजासाठी महामंडळाने गेल्या १० वर्षांत फक्त ४१ कोटींचे कर्ज वाटप केले. त्यातील २१ कोटी कर्ज आगाऊ धनादेश घेऊन वसूल करण्यात आले आहे. उर्वरित २० कोटींचे कर्ज बाकी आहे. हे कर्ज माफ करावे; अन्यथा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राज्यातील मुस्लिम जनता काँग्रेस आघाडीला धडा शिकवेल, असा इशारा तांबोळी यांनी दिला.

कोल्हारला दुकानातून १५ हजारांचे दागिने लुटले
राहाता, ७ जून/वार्ताहर
तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील सराफी दुकान फोडून चोरटय़ाने सुमारे १५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. शनिवारी मध्यरात्री ही चोरी झाली.संतोष भाऊसाहेब लोळगे (वय २७) यांचे कोल्हार येथे गौरव ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. चोरटय़ाने बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण
नगर, ७ जून/प्रतिनिधी
शहरातील बाबे आखेरत कब्रस्तानमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपमहापौर नजीर शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मगुरू हजरत पीरजादा आबीद कादरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून हकीम मौलवी मुजतफा फारुकी उपस्थित होते. निसर्गाचे महत्त्व पटवून देताना पर्यावरण, प्रदूषण, वृक्षारोपणाबद्दल माहिती देऊन समाजावर त्याचे होणारे परिणाम मौलवी फारुकी यांनी सांगितले. नगरसेवक नज्जू पहिलवान, समद खान, अय्युब शेख, सादिक, इसहाक बापू, शौकत तांबोळी, हनिफ जरिवाला, डॉ. शेख सईद, गफ्फार शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेख कादीर यांनी वृक्षारोपण केले.

मनपातर्फे वृक्षारोपण
नगर, ७ जून/प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने रेणुका उद्यान, शाहूनगर, केडगाव, महालक्ष्मी उद्यान, महापालिकेची नूतन प्रशासकीय इमारत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महापौर संग्राम जगताप, आयुक्त कल्याण केळकर, उपमहापौर नजीर शेख, उपायुक्त अच्युत हांगे, डॉ. पंकज जावळे, संदीप कोतकर, वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य नीलिमा बंडेलू, अनिल शाह, अभय ललवाणी आदी यावेळी उपस्थित होते.