Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

नवनीत

साधारणपणे तरुण माणूस संसारात पडल्यानंतर त्याचा अलौकिकाविषयीचा नाद कमी होऊन तो लौकिक व्यवहारात रस घेऊ लागतो, असा अनुभव आहे. असाच हिशेब मनाशी घालून नानकांचे पालक-

 

आई-वडील आणि बहीण-मेव्हणे त्यांचे लग्न लावण्याच्या तयारीला लागले. प्रभूची इच्छा, म्हणून ते विवाहवेदीवर चढले. कदाचित त्यांच्या मनात असा विचार असावा, जीवन्मुक्त पुरुषानेही पारिवारिक सुखदु:खांची अनुभूती घ्यावी, म्हणजे त्याबद्दल अधिकारवाणीने बोलणे त्याला शक्य होते. नानकदेवांचे या संदर्भात एक कवनही आहे. त्याचा भाव असा.. ‘ज्या माणसांच्या अंतरंगात कोमलता आणि प्रेमभाव वसत असतो, पण बाहेरून मात्र ते साधे, सरळ नि भाबडे दिसतात; असे लोक जगाला बरेच काही चांगले देऊ शकतात. त्यांचे मन परमात्म्याच्या निरंतर ओढीने भरलेले राहाते. त्याच्या दर्शनाची ते प्रतीक्षा करीत असतात. कधी देवदर्शनाचा आनंद त्यांना होतो आणि ते प्रेमविव्हल होऊन रडतात, तर कधी विरहव्यथेने अश्रुपात करतात. काही वेळा शांत, निवांत बसतात.’ नानकांना संसारी व्यक्तीविषयीसुद्धा किती जिव्हाळा होता, ते वरील विचारांतून जाणवते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी गुरुदासपूर बटाल्याच्या बाबा मूला यांची कन्या सुलक्खनीदेवी हिच्याबरोबर नानकांचा विधिवत विवाह झाला. (इ.स. १४८८) या विवाहसमारंभाचे काही तपशील नानकांच्या पुढील जीवनयात्रेच्या दृष्टीने बरेच महत्त्वाचे ठरतात. तळवंडी गावचे नानकांचे अनेक समवयस्क मित्र लग्नासाठी सुलतानपूरला आले होते. त्यापैकी बहुतेकांना नानकांनी गावात नोकरी मिळवून दिली. ही सर्व मंडळी पुढे नानकशिष्य बनली. यात भाई मनसुख आणि भाई भगीरथ हे मुख्य होते. भाई मनसुख यांनी पुढे नानकगीतांचे संकलन तयार केले. मरदाना हा मुसलमान मित्रही या काळात नानकांचा विशेष सोबती झाला. त्याने विवाहानिमित्त नानकांकडे नजराणा मागितला. त्याला नानकांनी ‘रबाब’ हे वाद्य भेटवस्तू म्हणून दिले. मरदाना पुढे आजीवन नानकवाणीचे श्रवण आणि तिचे रकाब वाद्यासह गायन करीत राहिला. या काळात नानकांची लोकप्रियता वाढली. त्यांचा मोठा शिष्यवर्गही तयार झाला. काही प्रतिष्ठित व्यक्तींना नानकांचा मत्सर वाटू लागला. त्यांनी दौलतखानाकडे अनेक तक्रारी गुदरल्या. नानकांची अनेकदा चौकशी करण्यात आली. धान्य गुदामांची तपासणी करण्यात आली. पण कोणताच गुन्हा शाबित होऊ शकला नाही. पण एकदा केवळ सूड उगवायचा म्हणून तपासणीच्या वेळी नानकांना एका कोठडीत बंद करून ठेवण्यात आले. आज सुलतानपूरला त्या कोठडीच्या जागी गुरुद्वारा ‘कोठारीसाहिब’ उभा आहे. ल्ल अशोक कामत

श्वेतविवर आणि जंतुविवर म्हणजे काय?
आइनस्टाइनने न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये आमूलाग्र बदल करून त्याला व्यापक रूप दिले. आइनस्टाइनच्या व्यापक सापेक्षतावादातील गणितीय सूत्रे ही विविध प्रकारची विश्वे व त्यातील अनेक प्रकारच्या चित्र-विचित्र वस्तूंच्या अस्तित्वाची शक्यता दाखवून देतात. यातील कृष्णविवरासारख्या काही वस्तूंचे अस्तित्व जरी निरीक्षणांद्वारे दिसून आले असले तरी अनेक अशाही वस्तू आहेत की, त्यांचे अस्तित्व निरीक्षणांद्वारे अजूनतरी सिद्ध झालेले नाही. श्वेतविवरे व जंतुविवरे या दोन अशाच प्रकारच्या फक्त गणिती अस्तित्व असलेल्या वस्तू आहेत. आइनस्टाइनची सूत्रे ही सममितीय (सिमेट्रिक) असल्याने अवकाशामधील प्रत्येक वस्तूबरोबरच तिच्या विरुद्ध प्रकारचे गुणधर्म असणाऱ्या वस्तूदेखील अस्तित्वात असू शकतात. श्वेतविवरांचे गुणधर्म हे कृष्णविवरांच्या अगदी उलट असतात. म्हणजेच श्वेतविवरे पदार्थ गिळंकृत करीत नाहीत, तर त्यामधून वस्तुमान बाहेर फेकले जाते. हे वस्तुमान कुठून येते हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करू की, विश्व हे एका घडी केलेल्या साडीसारखे आहे. जर या साडीवरील एखाद्या मुंगीला, साडीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जायचे असेल तर तिला प्रत्येक पदरावरून मार्गक्रमण करीत खूप दूरचा प्रवास करावा लागेल. मात्र लागोपाठच्या दोन पदरांना भोकं असतील तर तिला एका भोकातून आत आणि पुढच्या भोकातून बाहेर असा जवळचा मार्ग घेता येईल. या उदाहरणातील पहिले भोक म्हणजे कृष्णविवर आणि दुसरे भोक म्हणजे श्वेतविवर! ही दोन विवरे आणि त्यांना जोडणारा अदृश्य बोगदा यांना एकत्रितपणे जंतुविवर असे म्हणता येईल. अशा ‘शॉर्टकट’ प्रवासाच्या शक्यतेमुळे विज्ञानकथाकारांना ही जंतुविवरे खूप प्रिय असतात. मात्र आजपर्यंत कोणत्याही निरीक्षणांद्वारे त्यांचे अस्तित्व सिद्ध होऊ शकलेले नाही.
अनिकेत सुळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

आधुनिक पुरातत्त्व विद्येचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात जर्मन पुरातत्त्व शास्त्रज्ञ योहान योआमिख विंकलमान यांचा जन्म एका गरीब चर्मकाराच्या घरात ९ डिसेंबर १७१७ रोजी प्रशियातील रेंटडाल येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी धर्म आणि वैद्यक शास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. ग्रीक व लॅटिनवरील प्रभुत्वामुळे त्यांना एका विख्यात ग्रंथालयात कार्यवाह म्हणून नोकरी मिळाली. काही काळ अध्यापकाचेही काम त्यांनी केले. फ्रीड्रिख ओझर या चित्रकाराशी त्यांचा परिचय झाल्यावर त्यांनी चित्रकलेतही रस घेतला. रोमने कॅथालिक चर्चचे अनुयायी बनल्यावर त्यांनी रोम गाठले. तेथे पोपच्या प्रश्नचीन अवशेषांच्या विभागाचे ते प्रमुख बनले. इटलीत त्यांनी मोठय़ा प्रमाणात उत्खनन केले. उत्खनित शिल्पांची प्रश्नचीनता ठरवण्याचे पहिले आधुनिक तंत्र त्यांनीच विकसित केले. यावर ‘लेटर अबाऊट द हक्र्यूलॅनिअम डिस्कव्हरीज’ आणि ‘रिपोर्ट अबाऊट द लेटेस्ट हक्र्यूलॅनिअम डिस्कव्हरीज’ हे दोन ग्रंथ लिहिले. त्यांच्या ‘हिस्टरी ऑद द आर्ट ऑफ ऑटिक्किटी’ या ग्रंथामुळे त्यांचे नाव साऱ्या युरोपात झाले. नवअभिजातवादी कलासंप्रदायास उत्तेजन देण्यास त्यांचे ग्रंथ कारणीभूत ठरले. बराच काळ इटालीत व्यतीत केल्यावर मायभूमीची ओढ त्यांना लागली होती. बर्लिनच्या ‘फ्रीड्रिख-द ग्रेट’ या ग्रंथालयाच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूकही झाली होती. म्हणून जर्मनीत ते चालले असता वाटेत व्हिएतनाम येथे त्यांनी मुक्काम ठोकला. तेथे सम्राज्ञी माराया ट्रीएस्ट हिने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरव केला. ८ जून १७६८ रोजी ते ट्रीएस्ट येथे मुक्कामी असता एकाने त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
संजय शा. वझरेकर

नेहाचे घर शहराच्या वस्तीपासून थोडे दूर, शांत ठिकाणी होते. आजूबाजूला शेते आणि तीन-चार शेतमजुरांची विरळ वस्ती होती. नेहाचे वडील लष्करात मोठय़ा हुद्दय़ावर होते. ते तातडीच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. होस्टेलवर राहाणारी तिची मोठी बहीण शिवानी, नुकतीच मुंबईहून आलेली आत्या आणि आई अशा चौघी येणाऱ्या पाहुण्यांची वाट पाहात रात्री एक वाजेपर्यंत जाग्या होत्या. पाहुणे आले नाहीत. चौघी झोपायच्या तयारीला लागल्या. त्याच काळय़ामिट्ट रात्री बंगल्यापासून थोडय़ा अंतरावर शेतमजुरांच्या घरांत वेगळेच आणि भीषण नाटय़ घडत होते. सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या घरांत शिरून कुऱ्हाडींनी मारहाण करून जे मिळेल ते लुटले. संपूर्ण वस्तीवर दहशत निर्माण केली आणि मग आपला मोर्चा नेहाच्या एकाकी बंगल्याकडे वळवला होता. एकूण सात दरोडेखोर होते. त्यापैकी चौघे कंपाऊंडवरून आत शिरले. पहारेकरी शिपाई व आयाला शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी गप्प केले. उरलेल्यांनी फाटकातून आत प्रवेश केला. अंधारात त्यांच्या हालचाली सावल्यांसारख्या बिनआवाज झाल्या. तरीही आई मेनका हिला काहीतरी जाणवले आणि तिने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. हातात कुऱ्हाडी, काठय़ा, कोयते घेतलेले दरोडेखोर बंगल्याच्या आवारात पाहून त्या हादरल्या. बाकीच्यांना सावध केले आणि मदतीसाठी चौघी ओरडू लागल्या. पण वस्तीवरच्या कुणाची मदतीला येण्याची हिंमत होईना. आईने पोलिसांना फोन केला. तोपर्यंत दगडांचा मारा झाला. खळाखळा काचा फुटत होत्या. दरोडेखोर आत खिडकीतून येण्याचा प्रयत्न करीत होते. दारावर कुऱ्हाडीचे घाव बसू लागले. तसे नेहाने बहिणीच्या हातात चाकू दिला. आई आणि आत्याच्या हातात संरक्षणासाठी जे हातात मिळेल ते दिले. वडिलांची बारा बोअरची डबलबॅरल बंदूक घेतली. त्यात काडतुसे घातली आणि सेफ्टीकॅच काढून ती रणरागिणी सज्ज उभी राहिली. दरोडेखोर कोणत्याही क्षणी आत शिरतील अशी वेळ आली. बाहेरून मदतीची आशा संपली. मरायचंच तर लढून मरू अशा जिद्दीने क्षणाचाही विलंब न करता भरलेली बंदूक रोखून ती धाडकन दरवाजा उघडून बाहेर आली. समोर दिसणाऱ्या दरोडेखोरांकडे पाहात तिने हवेत गोळीबार केला. कानठळय़ा बसवणारा आवाज आणि समोर साक्षात चंडिका वाटणारी नेहा. दरोडेखोरांना हे अनपेक्षित होते. कुऱ्हाडी, काठय़ा बंदुकीसमोर कामाच्या नव्हत्या. समोरच्या अंधारात ते उसाच्या रानात निमिषार्धात नाहीसे झाले. घाबरून थरथरणाऱ्या आत्या, आई चकित होऊन नेहाचे नवे रूप पाहात राहिल्या. शिवानीने धावत येऊन पराक्रमी बहिणीला रडत मिठीत घेतले. जिवावर बेतल्यावर घाबरून जाणे ही सहज होणारी प्रतिक्रिया आहे. पण कठीण प्रसंगी भावनांवर ताबा ठेवून बुद्धीने निर्णय घेणे आणि तो अमलात आणणे हे भावनिक बुद्धिमत्तेचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.
आजचा संकल्प- भावनांवर ताबा ठेवून मी बुद्धीने कठीणप्रसंगी निर्णय घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com