Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

पाण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा
* पाणी चोरी थांबवा, उत्पन्न वाढवा
* गडकरींनी घेतला महापालिकेच्या कामाचा आढावा
* अंबाझरीत फुडप्लाझाचा प्रस्ताव
* एमएडीसीच्या मदतीने अग्निशामक यंत्रणा सक्षम करणार
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

२४ तास पाणी देण्याचे आश्वासन देऊन महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपला दोनवर्ष झाली तरी, सर्व वस्त्यांनापुरेसे पाणी देण्यात अपयश आल्याने पक्षाचे राज्याध्यक्ष नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त करीत पाण्याची चोरी थांबवा आणि वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा, अशा सूचना पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केल्या. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत सिमेन्ट रस्त्याच्या निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वी काढा, असेही ते म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये
गडकरींचे भाकित
नागपूर, ७ जून/ प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वाचे लक्ष विधानसभेकडे लागले असून राजकीय पक्षांनीही त्यांच्या तयारीला सुरुवात केली आहे. आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली नसली तरी भाजपला मात्र या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील, असा विश्वास आहे व त्याच दृष्टीने पक्षाने तयारीही सुरु केली आहे. विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली नसली तरी नवीन विधानसभा ही ऑक्टोबर महिन्यात अस्तित्वात येणे जरूरी आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमालाच प्राधान्य
नागपूर, ७ जून/प्रतिनिधी

सध्या सर्वच क्षेत्रावर जागतिक मंदीचा परिणाम झाला आहे. बारावीनंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. मात्र, गेल्या काही महिन्यात आलेल्या मंदीमुळे यावर काही प्रमाणात परिणाम होईल असे वाटत असले, तरी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत विशेष घट झाली नसल्याचे दिसून येत आहे. एआयईईई आणि एमएचसीईटी परीक्षांमध्ये अभियांत्रिकीचा पर्याय दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ही बाब स्पष्ट होते.

डुप्लीकेट प्रवेशपत्र मिळाल्याने एमपीएससीची परीक्षा सुरळीत
नऊ केंद्रांवर १८०० विद्यार्थ्यांची हजेरी
नागपूर, ७ जून/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यलोकसेवा आयोगातर्फे विशेष समाजकल्याण अधिकारी पदासाठी आज घेण्यात आलेल्या परीक्षेचे डुप्लीकेट प्रवेशपत्र जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे सुमारे ८५० विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली. नागपुरातील नऊ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. दोन दिवस आधीपर्यंत या परीक्षेचे प्रवेशपत्र काही विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले नव्हते, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता, हे विशेष.

बसपच्या कार्यकर्त्यांचे उद्या प्रशिक्षण शिबीर
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत केवळ मतदान वाढण्यावर समाधान मानावे लागलेल्या बहुजन समाज पक्षाने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून नागपूर विभागातील सहाही जिल्ह्य़ातील प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर येत्या ९ जूनला दुपारी १२ वाजता देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि उपाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या उपस्थितीत हे शिबीर होईल. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या दोघांवर राज्याची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या तीन वर्षांपासून गरुड हे विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुका आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून ते आता विदर्भ व मराठवाडय़ाचा दौरा करणार आहेत. नागपूरच्याआधी औरंगाबाद आणि सोमवारी अमरावती विभागातील कार्यकर्त्यांचे शिबीर होईल. जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी हे शिबीर आयोजित केले, अशी माहिती मिडीया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली.

मेयोमधील एमबीबीएसच्या जागा कमी होणार नाहीत
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्र्यांचे आश्वासन
नागपूर, ७ जून/प्रतिनिधी

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेयो) एमबीबीएस अभ्यासक्रमाची एकही जागा कमी होणार नाही, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी आणि आमदार अशोक मानकर यांनी नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. वैद्यक परिषदेने केलेल्या निरीक्षणात ज्या काही त्रुटी आढळून आल्या त्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. नागपूर सुधार प्रन्यासचे आर्किटेक्ट आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागांच्या संमतीने ही कामे करण्यात येणार आहेत. या दोन विभागातील समन्वय साधण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येऊन कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. तसेच वैद्यक परिषदेसोबतही बैठक येत्या चार- पाच दिवसात होणार असून त्यामध्ये मेयोचा प्रश्न निकालात निघेल, असे आश्वासनही याप्रसंगी शेट्टी यांनी दिले.

कर्मचाऱ्यांचे पंजाब नॅशनल बँकेसमोर धरणे
नागपूर, ७ जून/ प्रतिनिधी

युनायटेड बँक फोरमच्या संयुक्त विद्यमाने ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य शाखेपुढे धरणे देण्यात आले. येत्या १२ जूनला बँक कर्मचारी एक दिवसीय देशव्यापी संपावर जाणार आहेत. या संपात देशभरातील सुमारे १० लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. गुरुवारी पंजाब नॅशनल बँकेसमोर बँक कर्मचारी संघटनेचे नेते अशोक वेले, पी.जी. मेश्राम व अचल रामटेके, ईएमबीईएचे उपमहासचिव जयवंत गुर्वे, मिलींद वासनिक यांच्यासह इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष रामकुमार गुप्ता, बी.एन.जे. शर्मा यांनी १२ जूनला होणाऱ्या देशव्यापी संपाबाबत माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसदर्भात माहिती दिली. तसेच संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ईएमबीईएचे पदाधिकारी नवनीत माहेश्वरी, सुधीर कुडुपले, धर्मदास बागडे, विजय खापर्डे, पी.एन.बी ऑफिसर्स असोसिएशनचे आर.एल. कुंभारे, महासचिव पनीर सेल्वम, ममता वारके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन
नागपूर, ७ जून/ प्रतिनिधी

वाल्मिकी, सुदर्शन, मखियार इ. परंपरागत सफाईकाम करणाऱ्या सफाई कामगारांच्या विकासासाठी शासनाच्या लाड समितीने केलेल्या शिफारशी सर्व विभागांना लागू करण्यात येतील, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिले. ज्या समाजाने डोक्यावर मैला वाहिला, त्या समाजाच्या उत्थानासाठी राज्य शासनाने लाड समिती निर्माण केली होती. या समितीने शासकीय सेवेतील या कर्मचाऱ्यांसाठी वारस पद्धतीने नियुक्ती, कर्मचाऱ्यांच्या शिक्षित पाल्यांना सफाई कामगारांएटवजी वर्ग ३ मध्ये नियुक्ती इ. अनेक क्रांतिकारी शिफारशी केल्या. या शिफारशी काही महानगरपालिकांनी लागू केल्या, पण आरोग्य विभागाच्या हॉस्पिटलमधून व इतर शासकीय विभागांमध्ये त्या अजून लागू झालेल्या नाहीत. त्यामुळे या समाजावर अन्याय होत आहे, या विषयाकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी लाड समितीच्या शिफारशी सर्व विभागात लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.