Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

झाले गेले विसरून जाऊ, वस्तुस्थितीचे भान ठेवू;
आता विधानसभा एकत्रच लढवू! -आर.आर. पाटील
पिंपरी, ७ मे/प्रतिनिधी

 

लोकसभेला चुका दोन्ही बाजूंनी झाल्यात; परंतु आता आम्ही ठरविले आहे की, झाले गेले विसरून जाऊ, वस्तुस्थितीचे भान ठेवू आणि धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी आगामी विधानसभा एकत्रच लढवू, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आर.आर.पाटील यांनी आज येथे जाहीर केली.
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष वसंत वाणी यांच्या पुढाकाराने आयोजित समन्वयक प्रशिक्षण शिबिराच्या समारोपानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून हे शिबिर असल्याचे त्यांनी प्रारंभीच स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना ते म्हणाले की, ‘त्यावर खूप विचार केला. काही त्रुटी, उणिवा राहिल्या, चुका घडल्या; परंतु शहाणा माणूस त्याच त्याच चुका पुन्हा करीत नाही. विधानसभा निवडणुकीला त्याची प्रचीती आणून देऊ. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढले, मात्र जे एकमेकांना सहकार्य अपेक्षित होते ते मिळाले नाही, असे पाटील यांनी प्रांजळपणे मान्य करून कोल्हापूर, सांगलीचे दाखले दिले. हे सारे झाले गेले विसरून जाऊ, वस्तुस्थितीचे भान ठेवू आणि धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी विधानसभा एकत्र लढवू, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
मागच्या लोकसभेला राष्ट्रवादीच्या नऊ जागा, तर काँग्रेसच्या १३ होत्या. नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ७१, मात्र काँग्रेस ६९ वर थांबली. प्रत्येक निवडणुकीत उमेदवार स्थानिक विषय यानुसार संदर्भ बदलतात. आता त्या त्रुटी राहाणार नाहीत, असे सांगून आता नव्या दमाने लढायचे ठरविले आहे. भाजपने त्यांचाच पंतप्रधान होणार, असा दावा केला होता. मात्र त्यांच्या अपयशावर कोणी बोलत नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव हे होते’, हा इतिहास काही संघटनांच्या दबावाखाली सरकारने बदलला, असा आरोप शिवसेनेने केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणता, आपण जसे असतो तसे दिसतो. ते स्वत: जातीयवादी, धर्माध असल्याने त्यांना तसे वाटते. मात्र शासनाने कोणाच्याही दबावाखाली नाही तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय केला, असे सांगत पाटील यांनी राज्य सरकारची जोरदार पाठराखण केली.

पवनराजे निंबाळकर प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले नाही

सध्या गाजत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यावर पाटील यांना पत्रकारांनी छेडले असता, महाराष्ट्र शासनाने कोणालाही पाठीशी घातले नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सीबीआयचा अद्याप तपास सुरू आहे. जोपर्यंत ते कोणत्याही अंतिम निष्कर्षांप्रत येत नाहीत, तोपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे म्हणत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. सीबीआयने निष्पक्ष तपास करावा. दोषी असल्यास कारवाई करावी. आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, असेही ते म्हणाले.