Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘राष्ट्रवादी ‘बॅड पॅच’ मध्ये, मात्र उभारी नक्कीच घेऊ!’
पिंपरी, ७ जून / प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना,‘ राष्ट्रवादी सध्या ‘बॅड पॅच’मध्ये आहे,मात्र आपण पुन्हा एकदा नक्कीच उभारी घेऊ ’असा आशावाद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर.आर.पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवांची कारणमीमांसा करतानाच विधानसभेची रणनीती आखण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत येथील हॉटेल कलासागरमध्ये एकदिवसाचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्याच्या समारोपात पाटील यांनी कार्यकर्त्यांना उभारी देणारे भाषण केले. या शिबिराला केवळ ६० जणांना निमंत्रित करण्यात आले होते,मात्र अर्धेअधिक कार्यकर्ते फिरकलेही नाहीत.पालकमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांनीही या शिबिराकडे पाठ फिरवली.
राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले.अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले, िपपरीच्या महापौर अपर्णा डोके,ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली आबणे, जिल्हाप्रमुख वल्लभ बेनके, आमदार विलास लांडे, कमल ढोले पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आझम पानसरे ,पुणे महापालिकेतील सभागृह नेते अनिल भोसले,माजी महापौर वंदना चव्हाण,नगरसेवक रविंद्र माळवदकरआदीं प्रमुख उपस्थित होते. प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी शिबिराचे संयोजन केले होते.