Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘जेसीबी’च्या पंज्यात खेळणाऱ्या मुलाचा अंगावर दगड पडून मृत्यू
पुणे, ७ जून/प्रतिनिधी

 

खेळताना ‘जेसीबी’च्या यांत्रिक पंज्यामध्ये बसलेल्या एका आठ वर्षे वयाच्या मुलाचा पंजात भरलेल्या दगडांचा मार लागून मृत्यू झाला. लोहगाव येथील संतनगर भागात शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान झालेल्या या घटनेमध्ये आज जेसीबी चालकाला अटक करण्यात आली.
शुभम सिकंदर कोळेकर (रा. संतनगर, मारिया उद्यानाजवळ, लोहगाव) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून संतोष तुकाराम कसबे (वय ३०, रा. टिंगरेनगर, विद्यानगर, पुणे) या जेसीबी चालकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शुभमचे चुलते मुकुंद आनंद कोळेकर (वय ३१, रा. संतनगर, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. महिंद्रकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतनगर भागामध्ये लुंकड बिल्डरच्या प्लॉटजवळ खासगी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. कसबे हा ‘जेसीबी’च्या साहाय्याने रस्त्यावरील दगड बाजूला करण्याचे काम करीत होता. काम सुरू असलेल्या जागेपासून जवळच शुभमचे घर आहे. बांधकाम ठेकेदार असलेले कोळेकर हेही त्याच ठिकाणी राहातात.
दुपारी जेसीबीचे काम काही काळ बंद होते. त्यावेळी शुभम व त्याची लहान बहीण धनश्री ही जेसीबीच्या जवळच खेळत होती. जमिनीला टेकविलेला जेसीबीचा यांत्रिक पंजा पाहून त्याच्याजवळ हे दोघे खेळू लागले. उत्सुकतेपोटी दोघेही या पंजामध्ये जाऊन बसले व त्याच ठिकाणी काही काळ ते खेळत होते. दगड उचलण्याचे काम पुन्हा सुरू करायचे असल्याने कसबे याने जेसीबी सुरू केला. त्याचा आवाज ऐकून धनश्रीने तातडीने पंजातून खाली उडी मारली. मात्र त्याही परिस्थितीत कसबे याचे या दोघांकडे लक्ष गेले नाही. धनश्रीने बाहेर उडी मारली असली, तरी शुभम मात्र घाबरून पंजातच बसून राहिला. कसबे याने पंजाच्या साहाय्याने दगड उचलण्याचे काम सुरू केले. त्यावेळी पंजात बसलेल्या शुभमच्या डोक्याला दगडाचा मार लागला व तो पंजाच्या खाली पडला. त्यावेळी कसबे याच्या ही गोष्ट लक्षात आली. गंभीर जखमी झालेला शुभम दगडाच्या फटक्याने जागीच मृत्युमुखी पडला.
घडलेली घटना कसबे याने पोलिसांना न कळविता शुभमला थेट एका खासगी रुग्णालयात हलविले. मात्र तेथे शुभमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने अखेर कसबे ससून रुग्णालयात पोहोचला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. शुभमच्या मृत्यूला जबाबदार धरून कसबे याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.