Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पालखीमार्गावर स्वागत कमानींना बंदी
पुणे, ७ जून/प्रतिनिधी

 

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मार्गावर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेव्यतिरिक्त अन्य कोणालाही स्वागतकक्ष, कमानी किंवा मंडप उभारण्यास यंदाही पोलिसांनी बंदी घातली आहे. गेल्यावर्षी या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे, यावर्षी पोलीस काय भूमिका घेणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्तात १७ जून रोजी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन पिंपरी-चिंचवड व पुणे शहरांमध्ये होणार आहे. या बंदोबस्ताबाबत, तसेच अन्य सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती पोलीस सहआयुक्त राजेंद्र सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शहर पोलीस दलाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पाचशे गृहरक्षक दलाचे कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा, तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचे कर्मचारी पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहेत, अशी माहिती सोनवणे यांनी या वेळी दिली.
अतिरेक्यांचा धोका यंदाच्या वर्षीही भेडसावत आहे, असे सांगून सोनवणे म्हणाले की, पालखी सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेचा एक भाग म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेला पालखी मार्गावर स्वागतकक्ष, कमानी किंवा मंडप उभारण्यास मनाई करण्यात आली आहे.
वारकऱ्यांसाठी खाद्यपदार्थ, फळे, पाणी किंवा अन्य वस्तूंचे वाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी संबंधित पोलीस ठाणे किंवा प्रभारी अधिकाऱ्यांची परवानगी आणि महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. महापालिकेकडून वारकऱ्यांची निवासस्थानांची यादी पुरविण्यात येणार असून, तेथे जाऊन या स्वयंसेवी संस्थांनी वस्तूंचे वाटप करावे, असे आवाहन सोनवणे यांनी या वेळी केले. आवश्यकता भासल्यास वाटप करण्यात येणाऱ्या वस्तूंची पोलिसांकडून पूर्वतपासणी करण्यात येईल, असेही सोनवणे म्हणाले.
पालखी मार्गावर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांखेरीज अन्य वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. दुपारी बारापर्यंत हा नियम शिथिल करण्यात आला असून, त्यानंतर मात्र नागरिकांनी या मार्गावर आपले वाहन आणू नये, अशी सूचना सोनवणे यांनी केली आहे.

पोलिसांचे विशेष पथक
दहशतवादी हल्ल्याचा धोका पालखी सोहळ्याला नाही किंवा त्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून शहर पोलिसांना कोणत्याही प्रकारची सूचना मिळालेली नाही, असे पोलीस सहआयुक्त राजेंद्र सोनवणे यांनी आज स्पष्ट केले. मात्र समाजकंटक व देशविघातक शक्तींना रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. संपूर्ण राज्यातून आलेल्या निवडक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असल्याचे सोनवणे यांनी या वेळी सांगितले.