Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उपकरणांच्या मूल्यवर्धित करामधील कपातींचा फायदा मिळण्यास विलंब
पुणे, ७ जून/प्रतिनिधी

 

नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सौर उर्जेवर आधारित उपकरणांच्या मूल्यवर्धित करामध्ये कपात केली असून, यामुळे या वस्तूंच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के कपात होऊ शकते. याचा फायदा ग्राहकांना मिळण्यासाठी मात्र काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्पात विविध सवलती दिल्या जाणार हे अपेक्षितच होते. याचाच भाग म्हणून सौर ऊर्जेची यंत्रणा, सीएलएफचे दिवे, घरगुती वापराच्या गॅसच्या शेगडय़ा, नकली दागिने यावरील मूल्यवर्धित कर कमी केला गेला आहे. सौर ऊर्जेची यंत्रणा यामध्ये प्रामुख्याने सोलर पॅनेल, सोलर कुकर, सोलर पंपसेट, सोलर जनरेटिंग सेट या उपकरणाचा समावेश होतो. या उपकरणांवरील मूल्यवर्धित कर कमी करण्यात आला आहे. सोलर पॅनेलची किंमत साधारणत आठ ते दहा हजार रुपये आहे. सोलर कुकर पंधराशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत मिळतात.
सोलर वॉटर हिटरची शंभर लिटरची किंमत सुमारे २० हजारापासून आहे, तर दोनशे लिटरची किंमत ४५ हजार रुपये बाजारपेठेत आहे. या कमी झालेल्या करामुळे चार ते पाच हजार रुपयांनी या वस्तूच्या किमती कमी होणार आहेत. सोलर पंपसेट आणि सोलर जनरेटिंग सेट याच्या किमती पाच लाखापासून पुढे आहेत, त्याच्या किमतीही कमी होण्याची चिन्हे आहेत. सीएफएलच्या दिव्यांच्या किमतीत पन्नास ते शंभर रुपयांनी कपात होईल. एकूण बाजारपेठांचा आढावा घेतला असता सौरऊर्जेची यंत्रणा असलेल्या वस्तुंच्या किमतीत १० ते १५ टक्के किमती कमी होऊ शकतात. परंतु काही प्रमुख व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की प्रत्यक्षात या किमती कमी होण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अनेक कंपन्यांनी अगोदरच मालाचा साठा करून ठेवला असल्यामुळे तो माल बाजारपेठेमध्ये येऊन संपेपर्यंत कमी किंमत असलेला माल बाजारपेठांत उपलब्ध होणार नाही. यामुळे राज्य शासनाने जरी करामध्ये सवलत दिली असली तरी याचा फायदा मिळण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. शाश्वत सौर ऊर्जा उपकरणांसाठी शासनातर्फे अनुदानदेखील देण्यात येते. सोलर प ंपसेट व सोलर जनरेटिंग सेट यासाठी बँका कर्ज उपलब्ध करून देतात. परंतु या बँका कर्जासाठी अत्यंत काटेकोर नियम लावतात. यामुळेही यांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. यामुळे शासनाने दिलेली ही करकपात काही कालावधीनंतर लाभदायक ठरेल, असे ग्राहकांचे व दुकानदारांचे म्हणणे आहे.