Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘कायद्यापेक्षा सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज’
पुणे, ७ जून / प्रतिनिधी

 

कौटुंबिक िहसाचार रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असला तरी त्यापेक्षा सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज असून त्यासाठी सामाजिक चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे, असे मत अतिरिक्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी यावेळी व्यक्त केले.
कर्वे समाज सेवा संस्थेच्या बी.डी. कर्वे रीसर्च अ‍ॅन्ड कन्सल्टंसी सेल अंतर्गत कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र व रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट यांच्या वतीने ‘कौटुंबिक हिंसाचार विरोधी सरंक्षण कायदा २००५’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवालकर, रोटरी क्लबचे विलास जगताप, अजय भावे आदींची उपस्थिती होती. बी. डी. कर्वे सेलच्या संचालिका डॉ. आशा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर प्राची बोकील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपक वालोकर यांनी आभार मानले. कार्यशाळेत शहर परिसरातील १३० प्रशिक्षणार्थी सहभागी झाल्या होत्या.
कौटुंबिक िहसाचार कायद्याची पाश्र्वभूमी विशद करताना जयंत उमराणीकर म्हणाले, ‘‘स्त्रियांच्या अडचणींचा विचार करुन हा कायदा करण्यात आल्याने महिलांपुढे नवे पर्याय उभे राहिले आहेत. कौटुंबिक स्थितीबाबत समुपदेशन करण्यात येत असून हा दखलपात्र गुन्हा ठरत आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी याबाबत समुपदेशन करणे आणि त्यावेळी सल्ला घेणे हे फायदेशीर ठरणारे आहे. पुण्यात दरवर्षी पोलीस आयुक्तालयाक डून होणाऱ्या समुपदेशन केंद्रात ७५० प्रकरणे दाखल होतात. त्यापैकी चाळीस प्रकरणे समपुदेशनामुळे निकाली निघतात. हा कायदा पोलिसांच्या दृष्टीने सौम्य असून सुरक्षा अधिकाऱ्याने संबंधितावर लादलेली बंधने नाकारली तर पोलीस त्यावेळी हस्तक्षेप करतात. या गुन्ह्य़ासाठी तीन वर्षांची शिक्षा आहे. कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायदा झाला असला तरी त्यापेक्षा समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. सामाजिक सुधारणेसाठी सामाजिक चळवळ उभारली गेली पाहिजे.’’
समाजातील वा देशातील दहशतवाद रोखण्यासाठी नवनव्या शस्त्रांचा मार्ग स्वीकारला जातो. मात्र कौटुंबिक हिंसाचारविरोधी शस्त्रापेक्षा शास्त्राची गरज आहे. ते शास्त्र निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही उमराणीकर यांनी यावेळी व्यक्त केली. अर्चना मोरे, अनिता पगारे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.