Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘‘केरळमध्ये सेवा क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची मोठी संधी’
पुणे, ७ जून / प्रतिनिधी

 

‘‘केरळमध्ये सध्या सेवा क्षेत्राबरोबरच इतर सर्वच क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. त्यामुळे देश व विदेशातील अनेक कंपन्या आकर्षित होत असून, केरळमधील औद्योगिक आराखडा हा देशातील सर्वोत्तम आराखडा ठरला आहे,’’ अशी माहिती केरळचे उद्योगमंत्री इलामारम करीम यांनी आज दिली.
केरळ शासन व वर्ल्ड मल्याली कौन्सिलच्या वतीने आज येथे ‘केरळातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना करीम यांनी वरील माहिती दिली. कौन्सिलचे अध्यक्ष टी. पी. विजयन, केरळ स्मॉल स्केल इंचस्ट्रीजचे व्ही. के. सी. मम्मीद कोया तसेच एस. रामनाथ, टी. बाळकृष्णा, टी. ओ. सोराज आदींसह पुण्यातील विविध प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. केरळातील औद्योगिक परिस्थिती व गुंतवणुकीच्या विविध पर्यायांबाबत बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली.
करीम म्हणाले, ‘‘केरळातील ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) मागील काही वर्षांमध्ये झपाटय़ाने वाढ झाली आहे. सेवा क्षेत्रामध्ये ५८ टक्के जीडीपी आहे. तो १८ टक्क्य़ांनी वाढला आहे. सेवा क्षेत्राबरोबरच शेती क्षेत्रातही झपाटय़ाने वाढ होत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये समांतर विकास प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता नवा केरळ प्रगतीच्या दिशेने झपाटय़ाने पावले टाकीत आहे. पर्यटन, माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा आदींच्या बाबतीत मुख्यत लक्ष पुरविले जात आहे. उद्योगांना राज्यात आणण्यासाठी शासनही योग्य धोरणे आखत आहे. सध्या देशामध्ये विजेची समस्या आहे. मात्र, वीजनिर्मितीमध्ये केरळची स्थिती सर्वात भक्कम आहे.’’
केरळमध्ये कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे उद्योगांवर परिणाम होत असल्याबद्दल बैठकीत काहींनी मुद्दे उपस्थित केले. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘कामगारांची कोणताही समस्या नाही. शासनाने स्वत: पुढाकार घेऊन कामगार संघटनांशी चर्चा केली आहे. औद्योगिक विकासाला हातभार लावण्याची ग्वाही संघटनांनी दिली आहे.’’