Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दृष्टिहीनांना रोजगाराच्या संधीसाठी प्रयत्नाचे राष्ट्रीय अपंग आयुक्तांचे आश्वासन
पुणे, ७ जून / प्रतिनिधी

 

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकानुसार राज्यातील अंधांना रोजागाराच्या संधी मिळत नसतील, तर त्या का मिळत नाहीत या कारणांचा शोध घेऊन त्यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्र सरकारचे राष्ट्रीय अपंग आयुक्त टी. डी. धारीयल यांनी दिले.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या वतीने आयोजित पुणे शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. या वेळी संघमित्र सन्मान दृष्टी पुरस्कार हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अनुताई भागवत, लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर पुरस्कार अ‍ॅड. एस. के. रुंगठा यांना तर लुई ब्रेल स्मृती पुरस्कार हा कै. विजयदादा सरदार गुरुजी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे अपंग आयुक्त एम. एच. सावंत होते. या वेळी पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, बीसीयूडीचे संचालक डॉ. पंडित विद्यासागर यांची उपस्थिती होती. संस्थेचा परिचय अध्यक्ष महादेव गुरव यांनी तर सूत्रसंचालन महासचिव वसंत हेगडे यांनी केले.
केंद्र सरकारने अपंग, अंधांसाठी स्वतंत्र असे विधेयक करून त्यात त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानंतरही जर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसतील, तर ही गंभीर बाब आहे. या रोजगाराच्या संधी का निर्माण होत नाहीत, याबाबत शोध घेण्यात येईल. विधेयकानुसारच अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रीय अपंग आयुक्त टी. डी. धारियल यांनी दिली. पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अनुताई भागवत यांनी अंधांना सहकार्य करण्याची भूमिका मांडली. अंधांची उमेद वाढविली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.