Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

यंदा मात्र मागणीच्या प्रमाणात खताची उपलब्धता - देशमुख
पुणे, ७ जून/प्रतिनिधी

 

गेल्या वर्षी शेतकऱ्यांपर्यंत खते वेळेवर पोहोचली नव्हती, अशी कबुली कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यंदा मात्र मागणीच्या प्रमाणात खताची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर खतपुरवठा केला जाईल, असा दावाही त्यांनी केला.
पेरणीच्या काळामध्ये खतांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढते. गेल्या वर्षी याच वेळेला वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे पुरवठय़ाच्या बाबतीत समस्या निर्माण झाल्या होत्या. यावर्षी राज्य शासन वाहतुकीचा खर्च करणार असल्यामुळे वेळेवर खतपुरवठा होण्यास मदत होईल.
गेल्या वर्षी ३०.६१ लाख मेट्रिक टन खताची मागणी होती. यावर्षी ३५ लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा शासनाने मान्य केला असून, मे अखेपर्यंत १२.६६ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे व या खतांचे वाटप चालू आहे. गेल्या वर्षी पुरवठय़ाच्या संदर्भात विविध तक्रारी आल्या होत्या. यानुसार शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. खतांच्या पोत्यांवर छापलेल्या किमतीपेक्षा (एमआरपी) अधिक किंमत घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खते चोरणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. मागणी वाढल्यानंतर होणारा तुटवडा लक्षात घेऊन तीन लाख मेट्रिक टन खताचा साठा संरक्षित करण्यात आला आहे. यापैकी १.२४ लाख मेट्रिक टन साठा विक्रीसाठी खुला केला असून, १.७५ लाख मेट्रिक टन साठा गोडावूनमध्ये उपलब्ध आहे. बियाण्यांची गरज लक्षात घेता १६.७२ लाख क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. कंपन्यांशी केलेल्या चर्चेनुसार १८.२४ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. सोयाबीन, कापूस यांच्या बियाण्यांची उपलब्धता मागणीच्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर खते व बियाणे मिळतील, असा विश्वास कृषी आयुक्तांनी व्यक्त केला.