Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘नियमांचे पालन केले, तरच समाज सुरक्षित’
पुणे, ७ जून / प्रतिनिधी

 

सतर्क राहून काही मूलभूत नियमांचे पालन केले, तरच समाज सुरक्षित राहील, असे मत शहराचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी येथे व्यक्त केले.
‘स्वयं सुरक्षा अभियान’ तर्फे तयार करण्यात आलेल्या जनजागृतीपर पोस्टर व माहितीपत्रकाचे प्रकाशन डॉ. सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पोलीस सहआयुक्त राजेंद्र सोनवणे, अभियानाचे संचालक संदीप शर्मा, समन्वयक सुहास पवार आणि अ‍ॅमवे कंपनीचे पदाधिकारी अचिंत बॅनर्जी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
डॉ. सिंह म्हणाले, असुरक्षिततेच्या अंधकाराला हटविण्यासाठी लाठी किंवा गोळ्यांची गरज नाही. सतर्क राहून अंधकारातून प्रकाशाकडे म्हणजेच जीवनाकडे आपला प्रवास झाला पाहिजे. अभियानांतर्गत तयार करण्यात आलेले पोस्टर आणि माहितीपत्रके जागरूक राहून वाचणाराच यापुढील काळात वाचेल. ‘‘अपघात, चोरी, घरफोडी, संशयित व्यक्ती, वस्तू तसेच दहशतवाद या व अशा अनेक विषयांबाबत नागरिकांनी काय करावे व काय करू नये याचे मार्गदर्शन पोस्टरद्वारे करण्यात आले आहे. सतर्क राहून या नियमांचे पालन केले तरच समाज सुरक्षित राहील,’’ असे डॉ. सिंह म्हणाले. शहरातील विविध सोसायटय़ांची माहिती एकत्रित करून ती सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत या सोसायटी, कंपनी, संस्थांच्या आवारात ही पोस्टर लावण्यात येणार आहेत, अशी माहिती शर्मा यांनी या वेळी दिली. सोनवणे, पवार यांनी मनोगत व्यक्त केले.