Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हडपसरचा ऐतिहासिक परिचय आता पुस्तकबद्ध
सुधीर मेथेकर
हडपसर, ७ जून

 

आपण पुण्याचा इतिहास वाचला, तसा तो जाणून घेतला. आता शहरातील उपनगरांना (पूर्वीच्या गावांना) तेवढेच महत्त्व आलेले आहे. त्यांचीही प्रगती झपाटय़ाने होत असताना काळाबरोबर ऐतिहासिक पाऊलखुणा नष्ट होत आहेत. संस्कृतीत बदल होत आहेत हेच नेमकं लक्षात घेऊन हडपसर येथील चाळीशीतील तीन तरुणांनी हडपसरच्या इतिहासाची माहिती संशोधित करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. अन् त्यांना त्यात यश आलं अन् आकाराला आलं ‘हडपसर ऐतिहासिक परिचय’ हे पुस्तक.
‘हडपसर ऐतिहासिक परिचय’ या पुस्तिकेत लेखक संदीप (भाऊ) तुळशीराम तुपे, गणेश फक्कड टेमगिरे व जगदीश रामचंद्र लांजेकर यांनी हडपसर गावाचा इतिहास आपल्यासमोर मांडलेला असून या पुस्तिकेचे प्रकाशन स्वामी गोविंददेव गिरी (आचार्य किशोरजी व्यास) यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुस्तिकेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे भारतीय इतिहास संकल्प समिती (महाराष्ट्र) द्वारे पुरस्कृत करण्यात आले आहे.
हडपसरच्या इतिहासातील घडामोडी मांडताना गावचा ऐतिहासिक परिचय व पाश्र्वभूमी, आर्थिक व सामाजिक जीवन, मुख्य मंदिरे, कला- क्रीडा, संस्कृती क्षेत्रातील स्थान, राजकीय- शासकीय- न्याय व्यवस्था, शैक्षणिक प्रगती, गावावरील संकटे, इतिहासातील विशेष घटना, भैरवनाथ मंदिरातील मृद्भांडी व हडपरचे प्राचीनत्व, मंदिरातील वैशिष्टय़ आदी महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकलेला दिसून येत आहे. शहराच्या इतिहासाबरोबरच लगतच्या गावाचा इतिहास समोर येत असल्याने त्यांचे स्वरूप जनतेसमोर तर येतेच त्याचबरोबर संस्कृतीचा ठेवा सर्वसामान्यांसमोर असा पुस्तक रुपाने पुढे येत आहे.याबाबत आचार्य किशोरजी व्यास यांनी लेखकांचे कौतुक केले आहे. परिश्रम आणि जिद्द असल्यामुळेच लेखा-जोखा इतिहास आज आपल्यासमोर आला आहे.