Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पराधीनच आहे का जगती प्रवास मानवाचा?

 

राजीव खंडागळे आणि माझ्या मैत्रीची सुरुवात ही भांडणातून झाली. त्याच्या ‘आराधना’ नाटय़संस्थेनं आमच्या ‘रंगमंच, पुणे’ या संस्थेकडून त्यांच्या नाटकाकरिता सेटिंग्ज/लेव्हल्स भाडय़ानं घेतल्या आणि पैसे वेळेवर दिले नाहीत. त्यामुळे मी राजीव खंडागळेशी फोनवरून संपर्क साधला आणि याचा जाब विचारला. तोही तिरसटपणे काहीतरी बोलला. बुडाले आपले पैसे असं समजून मी गप्प बसलो. पण दोन दिवसांतच तो स्वत आला आणि त्यानं पैसे दिले.
त्यानंतर आमच्यातली तात्पुरती कटूता कधी संपली आणि मैत्री केव्हा सुरू झाली हे आम्हा दोघांनाही कळलं नाही. मग आमची वरचेवर गाठ पडू लागली. त्याच्या दुकानात (स्वस्तिक फूटवेअर) जायचं, त्याच्या जुळ्या भावाशी-संजीवशी गप्पा मारायच्या, बूट/चपला पाहायच्या, घालून बघायच्या आणि परत शोकेसमध्ये ठेवून द्यायच्या. संजीव खंडागळे तर एकदम राजा माणूस. दिलखुलास गप्पा मारायचा. गिऱ्हाईकांशी त्याचं वागणं, त्यांचा आदर करणं, त्यांना वस्तू घ्यायला प्रेमानं भाग पाडणं हे तर बघत राहावं असं होतं.
राजू असला की त्याच्याबरोबर शेजारच्या रामदास हॉटेलमध्ये जाणं, बिडी-चहा पिणं आणि नाटक, अभिनय, नट, सिनेमा, साहित्य यावर मनसोक्त गप्पा मारणं हा आमचा कार्यक्रम असायचा. तेव्हाच मला जाणवलं की हा खरा नाटकाचा नादी माणूस आहे. त्याच्या डोक्यात अष्टोप्रहर नाटक एके नाटक असायचं. मग तब्येत चांगली करण्याकरिता जीममध्ये जायचा. वाणी स्वच्छ व्हावी म्हणून मेहनत घ्यायचा. पंडित सत्यदेव दुबेजींकडून एकलव्यासारखी नाटकाची साधना त्यानं प्राप्त करून घेतली. ड्रॉपर्स ही संस्था जॉईन करुन त्यांच्या ‘वाटा पळवाटा’ या नाटकात अतिशय उत्तम काम केलं आणि जाणकारांची प्रशंसा मिळविली.
राजीवचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याला सर्वच क्षेत्रातील अत्यंत जवळचे असे खूप मित्र होते. मैत्रीचं हे चांदणं त्याच्या तळहातावर परमेश्वरानं अगदी मुक्तहस्तानं ठेवलं होतं. हे पण भाग्य फार कमी लोकांच्या नशिबात असतं. राजीवला अन्यायाविरुद्ध मनस्वी चीड होती. मग तो स्वतवर झालेला असो वा दुसऱ्याच्या वाटय़ाला येवो. शाब्दिक समाधान करण्यापेक्षा तो वृत्तीनं ते दाखवून तर देतच असे, पण त्यात अनेकांचे अकारण शत्रुत्वही ओढवून घेत असे. हे करताना स्वतच्या फायद्या-तोटय़ाची त्याला पर्वा नसे.
काही काळानंतर अचानक गांधीभवनच्या औद्योगिक वसाहतीत आमची भेट झाली. तेव्हा कळलं की त्यानं स्लिपर्स बनविण्याची फॅक्टरी काढलीय. मी विचारलं त्याला, की ‘हे काय नवीन आता?’ तेव्हा म्हणाला, ‘कारखाना काढलाय खरा, पण अपेक्षित फायदा नाही आणि मानसिक समाधान अजिबात नाही.’
‘अरे, नवीन आहे धंदा. काही काळ जावू दे, बस्तान बसेल. होईल सर्व ठीक’
‘नाही रे, माझं मन रमत नाही इथं. बस्तान बसलं, प्रॉफिट झाला तरी यात काही मजा वाटणार नाही.’ तेव्हा राजीव सतत अस्वस्थ, असमाधानी असायचा. कारखानदारी हे त्याचं क्षेत्र नव्हतचं नाटक, स्टेज, तिथलं निर्मितीचं चार्ज वातावरण, संहिता, अभिनय, प्रेक्षक, टाळ्या, प्रतिसाद हे त्याचं क्षेत्र होतं.
मग अनेक वर्षांनंतर त्याची भेट झाली ती मुंबईला- फिल्मसिटीत. जेव्हा मी माझ्या कॉलेजपासूनच्या दोस्ताला- सदाशिव अमरापूरकरला भेटायला गेलो तेव्हा! सदाशिव अमरापूरकर शॉटमध्ये बिझी होता. आपला हा जुना दोस्त मला अचानक भेटला म्हणून मी आणि अर्थात तो पण खूष होतो. मग एका निवांत जागी आम्ही पाय पसरून गप्पांचा फड जमविला. तेव्हा तो आनंदी दिसला. ‘‘मी माझ्या क्षेत्रात परत आलोय. नाटक, सिनेमा हेच माझं करिअर करायचं ठरवलंय. अर्थात हे सगळं मला जमतयं ते माझ्या भावामुळे- संजीवमुळे. खरं तो स्वत चांगला अभिनेता आहे, पण दोघांपैकी कुणी तरी एकाने दुकान चालविणे भाग आहे. ‘माझ्यापेक्षा तुझ्यात जास्त गुण आहेत तेव्हा तू लढ, मी थांबतो,’ म्हणून तो थांबला म्हणून पळू शकलो. माझ्यामागे त्याचा भक्कम आधार आहे, मग मला कशाची भीती?’’
मला त्यानं स्वतची सगळी स्वप्नं सांगितली. कधी काळी ही माझीही स्वप्नं होती. मनाशी म्हटलं, चला कोणीतरी स्वप्नांच्या दुनियेत आहे आणि ती पुरी करण्याकरिता झगडतोय, हे पण नशिबच. मी त्याची नंतर सदाशिवशी ओळख करून दिली. मला आश्चर्य वाटलं की सदाशिव त्याला एक उत्तम अभिनेता म्हणून आधीपासून ओळखत होता.
रुढ अर्थानं नटाला आवश्यक ते व्यक्तिमत्त्व, उंची त्याच्याकडे नव्हतीच. किंबहुना अभावच होता. पण स्वच्छ, स्पष्ट वाणी, काम करण्याची तडफ, भूमिका समजावून घेऊन ती साकार करण्याचं कसब त्यानं प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घेतलं होतं. ‘किरवंत’सारख्या अतिशय दर्जेदार नाटकात त्यानं डॉ. लागूंसारख्या जातीवंत नटासमोर उभं राहून तोडीस तोड अभिनय केला होता. त्याचं हे काम जाणकारांच्या, सामान्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्याचा अभिनय, त्याची प्रगती बघून मला क्षणभर त्याचा हेवाही वाटला. त्याची भविष्यातली कारकीर्द आता देदीप्यमान होणार यात मला तरी कुठलीही शंका वाटत नव्हती.
मग तो सिनेमाच्या क्षेत्रात शिरला. गाभारा चित्रपट दिग्दर्शित करून त्यात कामही केलं. १९९९ च्या राज्य चित्रपट स्पर्धेत गाभारा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरून त्याला सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला. त्याचं हे यश डोळे दिपवणारं होतं. त्याच वेळेला त्याची माझी ठेविले अनंते तैसेची राहावे, ही कथा घेऊन सिनेमा करावासा वाटला होता.
असा सगळा चढता आलेख असताना नियतीच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? त्याचा पाठीराखा भाऊ कॅन्सरनं अचानक गेला आणि राजीव अक्षरश कोलमडून गेला. म्हातारे आई-वडील, स्वस्तिक फूटवेअर या दुकानावरच मुख्यत चरितार्थ चालतो ते चालवायला कोणीही नाही या परिस्थितीत आवडनिवड बाजूला ठेवून तो दुकान सांभाळायला लागला. पण ही केवळ एक नियतीची ट्रायल होती.
आपण हतबल माणसं त्याला दुर्भाग्य म्हणो, नशिब म्हणो, प्रारब्ध म्हणो, कर्मभोग म्हणो. वा कै. विजय तें.च्या लेखी नियती म्हणो, जे घडलं ते भीषण होतं. मोटारसायकलवरून आपल्या एका मित्राबरोबर एसीपी इंगळेसाहेबांसह जाताना त्याला जबरदस्त अपघात झाला. इंगळेसाहेब त्या अपघातात तर गेले, पण हा जायबंदी झाला. राजीव वाचला, पण कुबडय़ा नशिबी आल्या. एका पायानं अधू झाला. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याच्या डोळ्यात मला खोल फक्त निराशा दिसली. अधू पाय घेऊन तो दुकानात बसू लागला. त्याच्या आईनं या सगळ्या घटनांमुळे हाय खाल्ली की काय ते माहित नाही, ती पण या जगातून कायमची निघून गेली. तेव्हा त्याच्या सांत्वनाला पण जायचा मला धीर झाला नाही.
दिवस गेले, महिने संपले, वर्षे सरलीत. काळ पुढे गेला. पुढे जातच राहिला. त्याच्या माझ्या भेटीगाठी कमी होत गेल्या. शेवटची त्याची भेट म्हणजे पुणे नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीसाठीच्या निवडणुकीकरिता मी उमेदवार म्हणून उभा राहिलो आणि त्याला भेटायला गेलो तो दिवस. तो नाटय़परिषदेचा सभासद असल्यामुळे त्यानं निवडणुकीला यावं आणि मतदान करावं म्हणून मी त्याला आग्रह केला. त्या दिवशीचा सगळा एपिसोड मला अजूनही डोळ्यासमोर दिसतो आहे.
राजीव म्हणाला, ‘बरं झालं तू उभा राहिला निवडणुकीला.’ एवढं बोलून तो समोरच्या रस्त्याकडे बघत राहिला. पण एक प्रचंड पॉज गेला. मी त्याच्याकडे बघत होतो. तो कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत गेला होता. परके, निर्जीव, तटस्थ, दूरस्थ असे भाव त्याच्या नजरेत होते. हा कुणीतरी वेगळाच राजीव खंडागळे आहे असं वाटत होतं. शांतता असह्य़ होत होती. एवढय़ात फोन वाजला. तो भानावर आला. अत्यंत थंड, निर्विकार, संथ आवाजात तो घरामध्ये स्वयंपाकीण म्हणून काम करणाऱ्या बाईला स्वयंपाकाच्या सूचना देत होता.
मी विचारलं त्याला की ‘आता घरात कोण कोण आहेत? वडील कसे आहेत?’ मग माझ्याकडे न बघता तो म्हणाला, ‘घरात आता कुणी बाईमाणूस नाही. मी आणि म्हातारे आजारी वडील दोघेच आहोत. मी भाजी आणून देतो. लंगडत दुकानात येतो. घरी परत आल्यावर वडिलांचे जास्त कमी बघतो. जेवतो आणि झोपतो. भाजी आणतो, दुकानात बसतो, घरी गेल्यावर वडिलांचे बघतो, जेवतो आणि झोपतो.’
हेच त्याने तीनदाचारदा सांगितलं. मग परत तो गप्प बसला. आता काय बोलावं? विचारावं? ते मला कळेना. मग मी बळेच त्याला विचारलं, ‘नाटक-सिनेमा बघतोस का? वाचतोस का?’
माझ्याकडे बऱ्याच वेळ बघून झाल्यावर तो अत्यंत नीरस, अलिप्त, पडेल आवाजात म्हणाला, ‘नाटक, सिनेमा असं काही नाही आता.’
परत एकदा थंडगार शांतता पसरली. मला त्या क्षणी कळून चुकलं की हा तसा आता संपलाय. जीवनाची आसक्ती, ओढ, उत्सुकता त्याची आता मेलीय. कुठल्याही शब्दांचा, भावभावनांचा, प्रेमाचा, मैत्रीचा, कलेचा धागा आता उरलाच नाहीए. बस्स तीच त्याची शेवटची जिवंत अशी भेट. मग एकदम बातमी कळली की रविवारी- ३१ मे रोजी झालेल्या त्याच्या मृत्यूची.
आता एकच प्रश्न सारखा मनात ठसठसतो आहे की आपलं आयुष्य, आयुष्यातील घटना, प्रसंग, नातेसंबंध, भावसंबंध, प्रयत्न, कर्तृत्व हे सगळं कोण ठरवतो? आपला आपल्या जगण्यावर काहीच अधिकार नसेल तर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत फरफटत जाणं एवढंच भागधेय माणसाच्या आयुष्यात आहे काय?..
जयंत बेंद्रे