Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘गटबाजी मोडून काढा; नंतरच निवडणुकांना सामोरे जा’
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चिंचवड, पिंपरी मतदारसंघासाठी आग्रह
िपपरी, ७ जून / प्रतिनिधी

 

गटबाजीच्या राजकारणामुळे काँग्रेसची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी पक्षातील गटबाजी मोडून काढा, अन्यथा काही खरे नाही, असा ‘घरचा आहेर’ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दिला. शहरातील चिंचवड आणि पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडून सोडवून घ्यावेत, असा जोरदार आग्रह या बैठकीत करण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेश सचिव सचिन साठे, एन. एस. यू. आयचे प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, महिला शहराध्यक्षा जयश्री गावडे, निरीक्षक रामशेठ ठाकूर, विरोधी पक्षनेते संतोष बारणे, नगरसेवक सनी ओव्हाळ, माजी उपमहापौर गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच माजी शहराध्यक्ष श्रीरंग बारणे हे या बैठकीस अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे, काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. यावेळी सचिन साठे, बाबू नायर, गौतम चाबुकस्वार, डॉ. प्रतिभा लोखंडे, गौतम आरकडे, संदेश नवले, स्वप्नील जाधव, गौतम आरकडे आदींनी आपली मते व्यक्त केली.
राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे, अशी शेखी मिरवून मावळ आणि शिरुर मतदारसंघावर राष्ट्रवादीने कब्जा केला. प्रत्यक्षात मात्र त्यांना दारुण पराभवास सामोरे जावे लागले. विधानसभेसाठी ताकतीच्या जोरावर राष्ट्रवादी पुन्हा अधिक जागा मागण्याची शक्यता आहे. तथापि, आता राष्ट्रवादीचे पितळ उघड पडले असल्याने त्यांना मतदारसंघ सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. शहरातील तीनपैकी चिंचवड आणि पिंपरी हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत. दोन्हीकडे काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी पक्षातील गटबाजी संपवा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तेव्हा आपण वैयक्तिक पातळीवर लक्ष घालू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. त्यानुसार, निरीक्षक रामशेठ ठाकूर येत्या ११ जूनला शहरात येऊन सर्वाशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर, ठाकरे यांच्या उपस्थितीत तीनही मतदारसंघात स्वतंत्र मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.