Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘इकोफ्रेंडली’ गृह योजनेसाठी निगडी प्राधिकरणाने मागविल्या निविदा
पिंपरी ७ जून / प्रतिनिधी

 

आर्थिक दुर्बलांसाठीच्या पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या दीड लाख रुपयांच्या स्वस्त घर प्रकल्पापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड प्राधिकरणामार्फत देशातील पहिला इकोफेंड्रली गृहप्रकल्प उभारण्याची जोरदार तयारी सुरु असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील दुर्बल घटकांसाठी, केंद्र सरकारच्या मदतीने ‘स्वस्त घर ’योजनेचा शुभारंभ दोनच महिन्यांपूर्वी झाला. चाळीत राहणाऱ्या शहरातील मध्यमवर्गीयांचीही अद्ययावत घराची स्वप्नं आहेत. त्याला खासगी बिल्डरचे घर परवडत नाही म्हणून आता ती गरज विचारात घेऊन प्राधिकरणाने ‘इकोफ्रेंडली’ प्रकल्पाची योजना आखली. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’(पीपीपी)माध्यमातून या प्रकल्पाला शासनाची मान्यता मिळाली आहे.त्यासाठी झोपटपट्टी पुनर्विकासाबाबतचे (एसआरए)चे नियम प्राधिकरण विकास नियंत्रण नियमावलीत अंतर्भूत करण्याचा निर्णयही नुकताच प्राधिकरण सभेत घेण्यात आला.
भोसरी येथील पेठ क्रमांक १२ मध्ये सुमारे ५७ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे.
अत्याधुनिक सुविधांनी युक्त असा हा प्रकल्प येत्या चार वर्षांत उभा कराण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे.
आजवर इतक्या मोठय़ा प्रमणावरची प्राधिकरणाची ही पहिलीच गृह योजना आहे.त्यातून १५ हजार कुटुंबांना स्वप्नवत घरे मिळतील.
‘स्वयंपूर्ण नियोजनबध्द शहर’अशी मध्यवर्ती संकल्पना मांडून प्राधिकरणाने ही ‘इकोफ्रेंडली ’ गृहप्रकल्प निर्मितीची योजना हाती घेतली आहे.
त्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची खास तरतूद केली आहे.
देशातील अशा प्रकारचा निमसरकारी संस्थेमार्फत उभारण्यात येणारा हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा प्राधिकरण प्रशासनाने केला आहे.त्यात पर्यावरणाभिमुख आणि सामान्य जनतेला परवडतील अशी किफायतशीर दरातील घरे उपलब्ध असतील.
शाळा,महाविद्यालय,रुग्णालय,उद्यान,खासगी बिल्डर देतात तशा प्रकारचे सांस्कृतिक मंदिर(क्लब हाऊस),जलतरण तलाव यापासून प्रशस्त रस्ते,मुबलक पाणी आदी सुविधा नागरिकांना मिळतील. पिंपरी -चिंचवड शहराची झपाटय़ाने होणारी वाढ,देश विदेशीतील शैक्षणिक संस्थांचा या परिसरात होणारा विस्तार,ऑटोमोबाईल,जैवतंत्रज्ञान,माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांसह नव्याने सुरु होणारे अनेक उद्योग पाहता घरांची निकड प्रचंड वाढली आहे.
या शिवाय होऊ घातलेला नियोजित आंतरराष्ट्रीय चाकण विमानतळ,मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्यागिक प्रदर्शन केंद्र,शहराच्या मध्यावरचे ऑटोक्लस्टर,महापालिकेचे नियोजित सायन्स पार्क,सीटी सेंटर या प्रकल्पांचा विचार करता नजिकच्या काळात या भागात पर्यावरणाभिमुख घरांचे महत्त्व व मागणीही वाढणार आहे.
या प्रकल्पात आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांचाही विचार होणार असल्याने त्यांचे तसेच मध्यमवर्गीय श्रमिकांचे ‘मॉडर्न’सोसायटीमधील घराचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.हा प्रकल्प आराखडा कसा असेल याची आता सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे.
तीन महिन्यांपूर्वी या प्रकल्पासाठी अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बांधकाम निर्मिती कंपन्यांन्यांचे पूर्व पात्रतेसाठी अर्ज मागविले होते,मात्र औद्योगिक मंदीमुळे कोणीही प्रतिसाद दिलेला नाही.त्यामुळे आता थेट पीपीपी तत्त्वावर ‘ऑफर’ मागविण्यात आल्या आहेत.