Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात
देहूगाव, ७ जून /वार्ताहर

 

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंधरा जूनला सुरू होणार असल्याने संत तुकाराम देवस्थान व देहू ग्रामपंचायत यांच्यावतीने वारकऱ्यांच्या सुविधांची व स्वच्छतेची कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, देहूच्या सरपंच शुभांगी मोरे व उपसरपंच प्रकाश हगवणे यांनी दिली .
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने देहू ग्रामपंचायत व देवस्थानची लगबग सुरू झाली आहे.
पालखी प्रस्थान पूर्वी चांदीच्या पालखीला व रथाला चकाकी देणे, तंबूची दुरूस्ती, दर्शन बारी व पालखी मार्ग सफाई, डागडुजी, परिसर स्वच्छता, मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था, क्लोज सर्किट टीव्ही यंत्रणा, सोहळ्याच्या दरम्यान लागणाऱ्या मदतीसाठी विविध शासकीय कार्यालयांशी व विविध सेवाभावी संस्थांशी प्रत्यक्ष भेटी व पत्रव्यवहार पूर्ण केला असल्याने प्रवासात कोणतीही समस्या राहणार नाही याची दक्षता देवस्थानच्या विश्वस्त व प्रशासनाचे प्रतिनिधी घेत आहेत.
देहू ते पंढरपूर पालखी मार्गाची व मुक्कामाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून सर्व सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले आहे तर ज्या ठिकाणच्या व्यवस्थेत कमतरता वाटते तेथे आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची कामे चालू आहेत.
देहू ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गटारांची साफसफाई, स्वच्छतागृहांची दुरूस्ती व सफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पदपथावरील दिवे लावणे, वारकऱ्यांच्या निवासासाठी प्राथमिक शाळा,धर्मशाळा यांची व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सर्व जलस्रोतांचे शुध्दीकरण करण्यात आले आहे.

पालखीला चकाकी देण्याचे काम चालू
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ गतवर्षी नव्याने करण्यात आला आहे. या रथाला चकाकी देण्यासाठी रथ तयार करणारे रमेशभाई मिस्त्री, राजुभाई मिस्त्री, प्रकाशभाई मिस्त्री हे प्रत्यक्ष मंदिरात येऊन हे काम करीत आहेत. हे काम दोन तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. पालखी रथा समवेत पालखी, महाराजांच्या पादुका, चौरंग, पाट, अब्दागिरी, गरूड टके, पांडुरंगाच्या मंदिरातील प्रभावळ, मंदिरातील प्रवेशद्वार, शिळामंदिरातील चांदीचा भाग यांना चकाकी देण्यात येणार आहे. चकाकी देण्यासाठी रिठे, चिंच, समुद्रातील वाळू व सामान्य स्वरूपातील सायनाईड पासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाने चकाकी देण्यात येणार असल्याची माहिती रमेशभाई मिस्त्री यांनी दिली.