Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

‘ऑनलाईन टेंडर’ च्या फक्त घोषणाच..
‘टेंडर सेल’नव्हे; मलई खाण्याचा कक्ष
विनायक करमरकर
पुणे, ७ जून

कोटय़वधी रुपयांच्या निविदा भरताना महापालिकेत होणारे गैरप्रकार अद्यापही थांबले नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ‘ऑनलाईन’ करण्याच्या नुसत्या घोषणाच महापालिका प्रशासन करीत असले तरी अद्याप केवळ निविदांचे अर्जच ऑनलाईनने मिळत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याची पद्धतच लागू आहे. परिणामी कंत्राटदारांची ‘दादागिरी’ही कायमच असून त्यामुळे खुली स्पर्धा न होता ठराविक कंत्राटदारच जादा दराची मलई खात आहेत.

झाले गेले विसरून जाऊ, वस्तुस्थितीचे भान ठेवू;
आता विधानसभा एकत्रच लढवू! -आर.आर. पाटील

पिंपरी, ७ मे/प्रतिनिधी

लोकसभेला चुका दोन्ही बाजूंनी झाल्यात; परंतु आता आम्ही ठरविले आहे की, झाले गेले विसरून जाऊ, वस्तुस्थितीचे भान ठेवू आणि धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी आगामी विधानसभा एकत्रच लढवू, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आर.आर.पाटील यांनी आज येथे जाहीर केली. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष वसंत वाणी यांच्या पुढाकाराने आयोजित समन्वयक प्रशिक्षण शिबिराच्या समारोपानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सेस वसुलीचा प्रश्न अद्याप अधांतरीच; व्यापाऱ्यांमध्ये असंतोष
पुणे, ७ जून / प्रतिनिधी

पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीनेच आता मार्केट यार्डात येणाऱ्या खरेदीदारांकडून सेस वसूल करावा, असा आडत्यांचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबित असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने व्यापारी वर्गांत याबाबत असंतोषाचे वातावरण तापू लागले आहे.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात राज्यासह परराज्यातून शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात. हा माल येथील स्थानिक आडते खरेदी करतात आणि अन्य छोटे मोठे बाहेरील व्यापारी तो माल त्यांच्याकडून नंतर खरेदी करतात. बाजार समिती कायद्याच्या नियमानुसार शेतक ऱ्यांकडून सेस वसूल करता येत नाही.

‘गटबाजी मोडून काढा; नंतरच निवडणुकांना सामोरे जा’
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चिंचवड, पिंपरी मतदारसंघासाठी आग्रह

िपपरी, ७ जून / प्रतिनिधी

गटबाजीच्या राजकारणामुळे काँग्रेसची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी पक्षातील गटबाजी मोडून काढा, अन्यथा काही खरे नाही, असा ‘घरचा आहेर’ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दिला. शहरातील चिंचवड आणि पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडून सोडवून घ्यावेत, असा जोरदार आग्रह या बैठकीत करण्यात आला.

वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे सर्वेक्षण होणार
पुणे, ७ जून/प्रतिनिधी

वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या मृत्यूचे सर्वेक्षण साक्षात्कार संस्थेच्या वतीने लोकांच्या सहभागातून करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक विलास काणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे सर्वेक्षण ५ जून २००९ ते ५ जून २०१० या कालावधीत करण्यात येणार आहे. प्राण्यांचे मृत्यू कोठे, किती व कसे होतात याचा सविस्तर अहवाल वनविभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध संस्थांच्या मदतीने कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे सर्वेक्षण केवळ एखादी संस्था अथवा शासन करू शकत नाही. त्यामुळे जे लोक प्राण्यांचा अपघाती मृत्यू पाहातील अशा सर्वानी फोटो व मृत्यूची तारीख, वेळ व ठिकाण ही माहिती स्वतच्या नावानिशी साक्षात्कार संस्थेकडे फ्लॅट नं. १५, शशिकांत टेरेस, तेजसनगर, कोथरूड, पुणे-३८ या पत्त्यावर किंवा sakshatkarpune@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने विलास काणे यांनी केले आहे.प्राण्यांच्या अपघाती मृत्यूवर एका निष्पाप जिवाचा अंत हा माहितीपट बनविला असून, हा माहितीपट नौटंकी डॉट या दूरचित्रवाणीवर उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

संत रामानंद महाराज यांच्या अस्थिकलशाची यात्रा
पुणे, ७ जून/प्रतिनिधी
संत रामानंद महाराज यांचा अस्थिकलश यात्रा आज पुण्यातील विमानतळापासून गुरू रविदास मंदिर तिसरे धाम या ठिकाणापर्यंत काढण्यात आली. संत रामानंद यांची ऑस्ट्रियामध्ये हत्या झाल्यानंतर पंजाबमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुखदेव वाघमारे यांनी त्यांचा अस्थिकलश पुणे येथे आणल्यावर तीनशेहून अधिक समाज बांधवांनी या अस्थिकलश यात्रेत सहभाग घेतला.

‘यशवंत सहकारी साखर कारखान्यात चांगल्या दर्जाची साखरच उत्पादित’
हडपसर, ७ जून/वार्ताहर

यशवंत सहकारी साखर कारखान्यात चांगल्या दर्जाची साखर उत्पादित केली जाते. तसेच कारखान्याचे सभासद व अनामतदार यांना शासनाच्या नियमास अधीन राहूनच साखरेचे वाटप केले जाते, असे स्पष्टीकरण कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी पत्राद्वारे केले आहे. कारखान्यात एल-३०, एम-३० व एस-३० या तीन ग्रेडचे साखरेपैकी एस-३० ही साखर सभासद व अमानतदार यांना वाटण्यात येते. विभागवार साखर वाटप खर्चिक असून, कारखान्याच्या कार्यस्थळावर चांगल्या प्रकारची साखर वाटप करण्याचे काम सुरू आहे. सदर साखर प्रत्येकी पाच किलो व १४ रुपये ४० पैसे या सवलतीच्या दराने सभासद व अमानतदारांना ती देण्यात येते, असेही त्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

आरोग्य चिकित्सा शिबिर
पुणे, ७ जून/प्रतिनिधी

आनंद मेडिकल फाउंडेशनच्या वतीने अस्थिरोग, दंतरोग व नेत्ररोग चिकित्सा शिबिर नुकतेच झाले. कोथरूड येथील सुबोध हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिरात ३७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुजय लोढा, दंतरोगतज्ज्ञ रीना व्होरा, नेत्ररोगतज्ज्ञ, डॉ. अमित रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली.

मनोरुग्ण तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
पिंपरी, ७ जून/प्रतिनिधी

भोसरी येथील तळ्यामध्ये आज सकाळी एका मनोरुग्ण तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
नीलेश बाळासाहेब फुगे (वय २३, रा. भोसरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मनोरुग्ण होता, असे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. तो घरामध्ये राहात नसून बाहेरच वास्तव्य करीत होता.
तो गेल्या काही दिवसांपासून परिसरातील लोकांना दिसून आला नाही. आज सकाळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाचे कर्मचारी भोसरी तळ्याजवळील विद्युतदाहिनीमध्ये बेवारस शव अंत्यविधीसाठी घेऊन जात होते. दरम्यान, त्यांना तलावामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.

माजी नगरसेवक सदावर्ते यांचा अपघाती मृत्यू
पिंपरी, ७ जून / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शंकर तुकाराम सदावर्ते (वय ५०) यांचे आज पहाटे सोमाटणे फाटा येथे झालेल्या अपघातात निधन झाले. सदावर्ते यांच्यासह रामदास खामगळ (वय ५५), नितीन मोहिते (वय २४), शांताराम नामदेव निरवाडे (वय ४५) हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे पाचच्या सुमारास सोमाटणे फाटा टोलनाक्याजवळ ट्रेलरवर मारुती कार जाऊन आदळली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर निगडी लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शंकर सदावर्ते हे सुरुवातीला तळेगावमधील एका हॉटेलमध्ये कामाला होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी चिंचवड येथे रामनगर प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व विजयी झाले होते.झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.शहर बहुजन समाज पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते सध्या कार्यरत होते.