Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

राजकीय गुन्हेगारीचा धोका पाकिस्तानच्या दहशतवादापेक्षा भयंकर- अण्णा हजारे
ठेवी परत न मिळाल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा
नाशिक, ७ जून / प्रतिनिधी

वेगवेगळ्या बँका व पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या एक हजार कोटी ठेवी अडकल्या असून त्या परत न मिळाल्यास एक ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देतांनाच बँका, पतसंस्था बुडण्यास राजकीय वरदहस्त कारणीभूत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. नाशिकसह सर्वत्र वाढणाऱ्या राजकीय गुन्हेगारीचा धोका

 

पाकिस्तानच्या दहशतवादापेक्षा अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीतर्फे येथील सिटू कामगार भवनात आयोजित विशेष राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. अण्णांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, राजू देसले, सुलोचना ठाकरे, पत्रकार श्रीकांत बेणी, अ‍ॅड. तानाजी जायभावे आदी उपस्थित होते.
बँका आणि बुडीत ठेवी हा प्रश्न गेल्या सहा वषार्ंपासून अनुत्तरीत आहे. कष्टकऱ्यांच्या पैशाची अमूल्य ठेव पतसंस्थांमध्ये सुरक्षित होती. मात्र अपप्रवृत्ती आणि राजकीय हस्तक्षेपामुळे बँका व पतसंस्थांकडून नियमबाह्य़ कर्ज देण्यास सुरूवात झाली. परिणामी बँका डबघाईला आल्या आहेत. दरोडेखोरांना चोरी करतांना पोलिसांची भिती असते, मात्र बँच संचालकांना राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे त्यांना अभय मिळाले आहे. या सर्व भ्रष्टाचाराचे मूळ मंत्रालयात असून आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्ष होऊनही लोकशाहीविषयी प्रश्न निर्माण झाला आहे, असेही हजारे म्हणाले. सर्वाना संघटीत होऊन स्वातंत्र्यासाठी दुसरी लढाई करावी लागेल, असेही ते म्हणाले.
राजकारणात वाढणाऱ्या गुन्हेगारीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा धोका सर्वात गंभीर असून या प्रकारास सरकारसह सर्वजण जबाबदार आहेत. हे सगळे संगनमताने होते, असा आरोपही त्यांनी केला. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. आंदोलनाशिवाय प्रश्न सुटत नाही. ठेवी परत मिळण्यासाठी शासनाने एक हजार कोटी रूपयांचे सॉफ्ट लोन मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली. आज राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही निष्क्रिय झाले असून त्यांना आंदोलन, मोर्चे यांची भीती वाटत नाही. भीती वाटते ती हातातून सत्ता जाण्याची, त्यामुळे संघटित होऊन अन्याय करणारे सरकार दूर सारावे, असे आवाहनही हजारे यांनी केले. आजकाल लोकांमध्ये मी, माझी वृत्ती वाढत आहे. आपण चार भिंतींच्या पलिकडचा संसार मानला. त्यामुळे इथपर्यंत आलो. संघर्ष करतांना अडचणी येतच राहतात, त्याचा सामना करायला शिकले पाहिजे, कोणतेही काम करतांना आयुष्यात नैराश्य येऊ देवू नका, असेही ते म्हणाले.
पद्मसिंहांना वरिष्ठांचे पाठबळ
अधिवेशनातून वेळ काढत हजारे यांनी नाशिकचे सहकारी पां. भा. करंजकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पद्मसिंहांना कोठडी मिळणे ही घटना न्याय व्यवस्थेवर पुन्हा विश्वास निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरेल, असे मत व्यक्त केले. पद्मसिंहांना वरिष्ठांचा पाठिंबा असून त्यांना खासदारकीचे तिकीट देऊन त्यांना निवडूनही आणले, हा प्रकार धक्कादायक आहे. जेथे घर आहे तेथे अग्नि आहे, असेही ते म्हणाले.
राजकीय गुन्हेगारीविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी महाराष्ट्रात प्रबोधन व लोकशिक्षण दौरा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.