Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचा गलथानपणा; आजपासून बेमुदत उपोषण
कर्जत, ७ जून/वार्ताहर

कर्जतमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि या

 

रुग्णालयाच्या कारभारात त्वरित सुधारणा व्हावी, या मागणीसाठी सोमवार (८ जून) पासून कर्जतच्या टिळक चौकामध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ आणि कर्जतमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने घेण्यात आला.
जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे दोन कोटी ३२ लाख रुपये निधी खर्च करून कर्जतमध्ये हे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले होते, मात्र उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंत कधीही या रुग्णालयाचा कर्जत तालुक्यातील रुग्णांना फारसा लाभ होऊ शकला नाही.
कर्जतमध्ये त्याकाळी अस्तित्वात असलेल्या मूळच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण करून १३ ऑगस्ट २००४ रोजी या नव्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले होते. ५० खाटांची सोय असलेल्या या रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक हे पद गेली सुमारे अडीच ते तीन वर्षे रिक्त आहे. त्यामुळे शासनाच्या मंजुरीप्रमाणे वैद्यकीय अधिकारी नेमावेत, रुग्णालयामध्ये औषधांचा पुरेसा साठा असावा, सर्प, विंचू, श्वान दंशाच्या लसी रुग्णांसाठी उपलब्ध व्हाव्यात, एक्स-रे तसेच पॅथॉलॉजी व ईसीजी यांसारख्या सुविधा रुग्णांना मिळाव्यात, रुग्णालयाच्या आवारातील बेकायदेशीर वाहनतळ बंद व्हावा, रुग्णालयामध्ये सुरक्षा कर्मचारी २४ तासांसाठी असावा, अशा काही महत्त्वाच्या मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
प्रस्तुत लेखी निवेदन आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे, आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव, मुंबई विभागाचे आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यविशारद, रायगडचे जिल्हाधिकारी, कर्जत तालुक्याच्या तहसीलदार माधवी भामरे, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र साटम, माजी आमदार सुरेश लाड आणि अन्य सर्व संबंधित अधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, हे उपोषण स्थगित करावे, अशी विनंती करण्यासाठी आरोग्य खात्याचे सहाय्यक संचालक डॉ. संजीव कांबळे आणि जिल्हा शल्यविशारद डॉ. नरेंद्र नेहुलकर यांनी उपोषणासाठी बसणाऱ्या दोन्हीही संस्थांच्या प्रतिनिधींशी शुक्रवारी (५ जून) सायंकाळी उशिरा सविस्तर चर्चा केली. त्यावेळी काही मागण्या मंजूरही करण्यात आल्या, मात्र मूलभूत मागण्या मंजूर होईपर्यंत उपोषणाबाबतचा निर्णय स्थगित करण्यास या उभय संस्थांकडून स्पष्टपणे नकार देण्यात आला. या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक भगत, कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडे, माजी अध्यक्ष श्रीराम पुरोहित, कर्जतमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष केतन जोशी व मंडळाचे अन्य पदाधिकारी नगरसेवक भालचंद्र जोशी हेदेखील यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते.