Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन यंत्रणेची चाचणी
पालघर, ७ जून/वार्ताहर

तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास त्या काळात त्या परिसरात व्यवस्थापन कसे करता येईल, यासंबंधीची रंगीत तालीम आज पहाटेपासून घेण्यात आली.

 

अणुकेंद्रात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत शेजारचे कंबोडे हे गाव प्रस्तावित झाल्याचे गृहीत धरून परिस्थिती हाताळण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले, तर या रंगीत तालमीदरम्यान ज्या काही त्रुटी-उणिवा राहिल्या, त्या दूर करण्याबरोबर काही आवश्यक सुधारणा करण्याच्या दृष्टीने पुढील काळात प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अणुऊर्जा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आज पहाटे नियोजित साडेपाचऐवजी ५.५० वा. अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची घोषणा अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्थळनिर्देशकांनी केल्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पातून तालुका-जिल्हा स्तरावरील आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली. स्थळनिर्देशकांनी त्या परिस्थितीची माहिती तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी इ.ना. दिली. त्यानंतर ही यंत्रणा कामाला लागून जे गाव प्रभावित झाले आहे, त्या ‘कंबोडे’ गावातील ग्रामस्थांना पालघर येथील जि. प. प्रश्नथमिक शाळेच्या आवारातील नियोजित ठिकाणी हलविण्यासह तेथे त्यांना औषधोपचार, खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेसह आवश्यक किमान सुविधा पुरविण्याबाबतची चाचपणी घेण्यात आली.
महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांऐवजी उपजिल्हाधिकारी माधव कुसेकरसह उपविभागीय अधिकारी नवनाथ जरे, तहसीलदार दिलीप संखे, तसेच एस. टी. परिवहन, दूरध्वनी, मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी या रंगीत तालमीदरम्यान उपस्थित होते. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही या भागात भेट दिली.
बोईसर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच त्यांच्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, अग्निशमन यंत्रणा, नागरी सुरक्षा दल, आरोग्य विभाग यंत्रणा, रेल्वे अधिकारी तथा अणुऊर्जा प्रकल्पाचे सर्व स्तरांतील अधिकारीदेखील या दरम्यान उपस्थित होते. या तालमीतून अशाप्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रकल्प यंत्रणेसह राज्य प्रशासन यंत्रणाही तोंड देण्यास पुरेशी सज्ज असल्याचे दिसून आले.