Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ५७.५ मि.मी. पाऊस
सर्वाधिक पाऊस रत्नागिरीत; तर खेडमध्ये सर्वात कमी
रत्नागिरी, ७ जून/खास प्रतिनिधी

शनिवारी दुपारी अडीच वाजता सुरू झालेल्या वरुणराजाने सलग तीन तास बरसून रत्नागिरीकरांची दाणादाण उडवून दिली. त्यानंतर दोन-अडीच तासांच्या विश्रांतीनंतर रात्री पुन्हा सुरुवात केली. आज पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला असून, काल दुपारपासून विस्कळीत झालेले जनजीवन

 

पूर्वपदावर आले आहे.
आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५१७.६ मिमी (सरासरी ५७.५) पर्जन्यवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस रत्नागिरी तालुक्यात १६८.४ मिमी पडल्याची नोंद झाली असून, सर्वात कमी खेड तालुक्यात केवळ आठ मिमी पाऊस पडला आहे. वरुणराजाच्या जोरदार आगमनामुळे शेतकरीराजा, तसेच तहानेने व्याकूळ झालेली जनता सुखावून गेली आहे, तर कालच्या पावसात खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी पुन्हा सुरू झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत पडलेल्या पर्जन्यवृष्टीची तालुकावार आकडेवारी पुढीलप्रमाणे, तर गतवर्षी याच तारखेला (७ जून २००८) पडलेल्या पावसाची आकडेवारी कंसात दिली आहे. सर्व आकडे मिलिमीटरमध्ये-
मंडणगड- ३०.२ (११२.४), दापोली- ४५ (१०७.४), खेड- ८ (५५), गुहागर- ५९ (६७), चिपळूण- ७६ (५२), संगमेश्वर- ८० (११९), रत्नागिरी- १६८.४ (६५), लांजा- ३७ (८९) व राजापूर- १४ (७८). रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या पाण्याची पातळी गेल्या २४ तासांत बऱ्यापैकी सुधारली असून, आता त्यामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तर कालच्या धुवाँधार पावसामुळे पाणी गटाराच्या शोधात रस्त्यावरूनच वाहू लागल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. अनेक दुचाकी व तीन चाकी वाहने रस्त्यातच बंद पडल्यामुळे शहरातील वाहतूक दीड तास विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी रस्त्यावर दरड, तसेच झाडे उन्मळून पडल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. आज सकाळपासून आकाशात ढग जमा झाल्याचे दिसत असले, तरी पावसाचे बरसणे मात्र थांबले आहे.