Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

चिपळूणला पावसाचा तडाखा
चिपळूण, ७ जून/वार्ताहर

मुसळधार पावसाने शनिवारी दुपारी चिपळूण शहर आणि परिसराला जोरदार झोडपले. शहरातील

 

काही ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
गेले दोन दिवस चिपळूणला ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाची हलकीशी रिपरिपही होत होती. गेले तीन महिने कडक उन्हाचे चटके सोसणाऱ्या चिपळूणकरांना प्रतीक्षा होती ती मुसळधार पावसाची. दुपारी अचानक ढग काळवंडले आणि विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चिपळूणला झोडपायला सुरुवात केली. दुपारी अडीच वाजता सुरू झालेल्या पावसाने तासभर चांगलाच ओलावा दिला.
दरम्यान, पावसाने नगर परिषदेचा भोंगळ कारभाराचा नमुना नागरिकांना पाहावयास मिळाला. आपत्ती व्यवस्थापनात नाले, गटारे यांच्या सफाईचा दावा करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे गटारे तुंबून गटारांतील पाणी रस्त्यावर आल्याने रस्ते जलमय झाले होते.
शहरातील नगर परिषदेजवळून खेड परिसराकडे जाणारा रस्ता तर चिपळूणची पूरसदृश स्थितीच दर्शवित होता. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी आल्याने नागरिकांची आणि वाहनचालकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेकांनी या पाण्यातूनच वाहने काढण्याचा प्रयत्न केला. त्या नादात एक रिक्षा पाण्यातच बंद पडली.
शहरातील मच्छीमार्केट परिसरातही तशीच स्थिती पाहावयास मिळाली. तेथील दुकानांलगत असलेली गटारे तुडुंब भरून त्याचे पाणी रस्त्यावरून वाहात होते. हलकासा पाऊस पडला, तरीही या परिसरात अशीच स्थिती होते. न. प. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी तेथील व्यापाऱ्यांनी केली. सायंकाळी उशिरापर्यंत शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती.