Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कोकण रेल्वेवरील ‘रो-रो’ सेवा फायद्यात
चिपळूण, ७ जून/वार्तावर

कोकण रेल्वे मार्गावर रो-रो (रोड ऑन रेल) सेवा मागील १० वर्षापासून यशस्वीरीत्या सुरू आहे. या सेवेतून महामंडळाला आतापर्यंत १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे महामंडळाचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी, कोकण रेल्वेने आता रो-रोची अजून एक नवीन सेवा वेरणा ते सुरतकल दरम्यान नुकतीच सुरू केली आहे. या सेवेतून महामंडळाच्या

 

उत्पन्नात भर पडणार आहे.
रो-रो सेवेमुळे रेल्वेकडे वाहतुकीचा येणारा माल जो रोडवेजकडे वळला होता तो परत आला आहे. शिवाय इतर रोडवेजची मालवाहतूक कोकण रेल्वेने आपल्याकडे खेचली आहे. या सेवेमुळे रेल्वे, ट्रकमालक यांचा फायदा झाला आहे. तसेच डिझेलची बचतही झाली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे. प्रदूषणालाही आळा बसला आहे. कोलाड (मुंबईहून १४५ कि.मी.) ते वेरणा (४१७ कि.मी.) व कोलाड-सुरतकल (७२१ कि.मी. अंतर) या स्टेशनादरम्यान दोन रो-रो सेवा सुरू आहे. आता वेरणा आणि सुरतकल दरम्यान कोकण रेल्वेने तिसरी रो-रो सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे कोलाड-वेरणा १२ तासांत, कोलाड-सुरतकल २० तासांत, तर वेरणा-सुरतकल हे अंतर केवळ पाच तासांत पूर्ण होते. ज्याला रस्ता वाहतुकीसाठी अनुक्रमे २४, ४० व १० तास लागतील. रो-रो सेवा ही रस्ता वाहतुकीच्या मानाने स्वस्त व जास्त प्रमाणात पर्यावरण अनुकूल आहे. या सेवेद्वारे आतापर्यंत १.६ लाख ट्रकांची वाहतूक करण्यात आली आहे.