Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

औषधपेढी संकल्पनेला चालना मिळण्याची गरज
संगमेश्वर, ७ जून/वार्ताहर

अन्न, वस्त्र, निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, तद्वत विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे औषध ही एक चौथी गरज सध्या अनिवार्य झाली आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वानाच आयुर्मान वाढविण्यासाठी औषध हवे असते. गरिबांना अशी औषधे सहज व मोफत उपलब्ध व्हावीत,

 

यासाठी कोसुंब येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव यांनी औषधपेढीची संकल्पना मांडली असून याला चालना मिळण्याची गरज आहे. कोणताही रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याला दिले जाणारे औषध हे सर्व आजारांवर विविध प्रकारच्या स्वरूपात असते. यातील औषधे दोन दिवस घेतल्यानंतर बरे वाटल्यास उर्वरित औषधे कोणी घेत नाही. औषध घेणे तसे कोणालाही आवडत नाही. घरामध्ये उरलेली औषधे कालांतराने वाया जातात व बहुतेकवेळा ती टाकून दिली जातात. औषधांच्या किमती जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीपेक्षा अधिक वेगाने वाढत असतात. त्यामुळे गरिबांना आवश्यक असणारी औषधे बऱ्याचदा त्यांच्या किमतीमुळे खरेदी करणे परवडत नाही. अशा गरीब रुग्णांसाठी औषधपेढी ही संकल्पना दिलीप जाधव यांनी मांडली आहे. यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घेतल्यास आणि डी. फार्म झालेल्यांनी सामाजिक बांधिलकीतून काही वेळ दिल्यास ही संकल्पना राबविणे शक्य असल्याचे मत जाधव यांनी मांडले आहे.
अशा प्रकारची औषधपेढी सुरू केल्यास प्रत्येक घरामध्ये वाया जाणारी विविध प्रकारची औषधे उपयोगात येतील व यामधून गरीब रुग्णांचा फायदा होऊ शकेल. याचबरोबर विविध प्रकारच्या औषध कंपन्यांना विनंती करून औषधपेढीसाठी औषधांची मदत मिळविता येऊ शकेल. या कामी सेवाभावी डॉक्टर व डी. फार्म झालेल्या तरुणांची मदत घेता येऊ शकेल. संगमेश्वर तालुक्यासाठी औषधपेढीची संकल्पना सत्यात उतरविण्याकरिता आणखी काही मंडळींनी पुढे येऊन संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.