Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

दोडामार्ग तालुक्यात ३७४ मिमी पावसाची नोंद
सावंतवाडी, ७ जून/वार्ताहर

गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात ३७४ मिमी पाऊस कोसळला. जिल्ह्यात सर्वात कमी १७ मिमी वैभववाडी तालुक्यात नोंदला आहे. आठही तालुक्यांत १२१८

 

मिमी पाऊस कोसळला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी आठ वाजता नोंदविला गेलेला २४ तासांचा पाऊस असा- सावंतवाडी १३६ मिमी, दोडामार्ग- ३७४ मिमी, वेंगुर्ले १८६ मिमी, कुडाळ १२२ मिमी, वैभववाडी १७ मिमी, मालवण १२८ मिमी, देवगड १६९ मिमी व कणकवली ८६ मिमी. मृग नक्षत्र व वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला संततधार पाऊस कोसळला. पावसाने दमदार सलामी दिल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघाला आहे. पौर्णिमेमुळे सागराला उधाणही आले होते.
या हंगामातील संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर गाडय़ा घसरून अपघात घडले. तसेच झाडे उन्मळून पडण्याचे प्रकारही घडले. या पावसाने शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना आता वेग येईल, असे सांगण्यात आले.
शनिवारी संध्याकाळी अधूनमधून कोसळणारा पाऊस आज दुपारनंतर थोडा कमी झाला. मात्र सकाळीही पावसाने जोर धरल्याने सह्याद्रीच्या पट्टय़ातील नाले, ओहोळ प्रवाहित झाले. नदी, नाले, विहिरींना अंशत: पाणीसाठा झाला असून, शेतीचा तरवा लावण्यासाठी हा पाऊस काही भागांत उपयोगी ठरेल, असे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे. हा पाऊस समाधानकारक असून शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांना त्यामुळे सुरुवात होईल. खरीप हंगामाला मृग नक्षत्राने प्रश्नरंभ करण्यात येतो.