Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

धोनी खुश हुआ!
ट्रेन्ट ब्रिज, ७ जून / पीटीआय

बांगलादेशविरुद्ध मिळविलेल्या सलामीच्या सामन्यातील विजयामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी समाधानी आहे. संघाला जी सुरुवात अपेक्षित होती, तशीच ती झाल्याचे

 

धोनीने सांगितले.
पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, कोणत्याही स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि आम्ही तशी सुरुवात केली. धोनीने अशी कबुलीही दिली की, रोहित शर्मा व गौतम गंभीर या सलामीवीरांनी जी सुरुवात करून दिली, त्याचा फायदा नंतरच्या फलंदाजांना उठविता आला नाही. तरीही युवराजच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे भारताने १८०चा टप्पा गाठला. विजयासाठी ही धावसंख्या पुरेशी होती.
धोनी म्हणाला, सलामीची जोडी फुटल्यानंतर मी आणि गौतमने धावांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्यात यश आले नाही. पण अखेर युवराजच्या वादळी खेळीमुळे आम्ही १८० धावांपर्यंत मजल मारू शकलो. युवराजला त्याचे श्रेय द्यायला हवे. धोनीने युवराजचे कौतुक करताना सांगितले की, युवराज जेव्हा ऐन भरात असतो, तेव्हा त्याची फलंदाजी पाहण्यासारखीच असते. जेव्हा त्याची बॅट बोलू लागते तेव्हा कोणतेही मैदान त्याच्यासाठी कमीच पडते.
भारतीय संघात एकजूट आहे, हे सांगायलाही धोनी विसरला नाही. भारतीय संघ नेहमीच एकसंध होता. लोक त्याबद्दल बाहेर काय बोलतात, याला मी महत्त्व देत नाही, असे धोनीने स्पष्ट केले.
भारताच्या वेगवान गोलंदाजांना बांगलादेशची सलामीची जोडी फोडण्यात अपयश येत असल्याचे पाहून धोनीने युसूफ पठाणच्या हाती चेंडू सोपविला आणि भारताला लगेचच यश मिळाले. याबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, वेगवान गोलंदाज निष्प्रभ ठरत आहेत, हे पाहून मी वेगळे काहीतरी करण्याचे ठरविले. शिवाय, युसूफबद्दल बोलायचे झाले तर आयपीएलमध्येही तो गोलंदाज म्हणून सातत्यपूर्ण कामगिरी करीत होता. रोहित शर्मा, सुरेश रैना यांनीही गोलंदाज म्हणून उपयुक्त कामगिरी केली होती. म्हणूनच वेगवान गोलंदाज चालत नाहीत, हे पाहून वेगळे डावपेच मी आखले.
बांगलादेशचा कर्णधार मोहम्मद अश्रफुल म्हणाला की, आम्ही ज्या २० अवांतर धावा दिल्या त्याच आम्हाला महागात पडल्या. आम्ही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही कमी पडलो. सामन्यात सर्वोत्तम ठरलेल्या प्रज्ञान ओझाने सांगितले की, थंडीमुळे गोलंदाजी करणे सोपे नव्हते. पण मला जे यश मिळाले त्याबद्दल मी समाधानी आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये माझे ज्या चमकदार पद्धतीने पदार्पण झाले, ते मी विसरू शकणार नाही.