Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सॅम्प्रसच्या विक्रमाशी फेडररची बरोबरी
फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर अखेर मोहोर
पॅरिस, ७ जून / वृत्तसंस्था

स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररचा यंदाच्या फ्रेंच ओपनमधील विजेतेपदाचा स्वप्नवत प्रवास आज अखेर सत्यात उतरला. सातत्याने गेली तीन वर्षे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरीची पायरी चढल्यानंतरही लाल मातीच्या कोर्टवरील असाध्य ठरलेले विजेतेपद अखेर चौथ्या वर्षी फेडररने

 

सहजसाध्य करून दाखविले. हे विजेतेपद निव्वळ एक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद नव्हते तर फेडररचे चारही ग्रॅण्डस्लॅमचे वर्तुळही यानिमित्ताने पूर्ण झाले. अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने मिळविलेल्या १४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाशीही फेडररने या विजेतेपदाने बरोबरी केली. चारही ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या फ्रेड पेरी, डॉन बज, रॉड लेव्हर, रॉय इमर्सन व आंद्रे आगासी या खेळाडूंच्या पंक्तीत फेडररने आज स्थान मिळविले. स्वीडनच्या रॉबिन सॉडरलिन्गला ६-१, ७-६ (७-१), ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत करीत फेडररने आपल्या या अविस्मरणीय विजयाची नोंद केली. गेली तीन वर्षे सातत्याने ही स्पर्धा जिंकणाऱ्या राफेल नदालला पराभूत करणाऱ्या सॉडरलिन्गला सरळ सेटमध्ये नमविण्याची करामत फेडररला करून दाखविता आली. आंद्रे आगासी स्वत: ही लढत पाहण्यासाठी उपस्थित होता. त्याच्या हस्तेच फेडररला झळाळता चषक देण्यात आला. त्यानंतर स्वित्र्झलडचे राष्ट्रगीत वाजू लागल्यावर तर फेडररच्या भावनांचा बांध फुटला.
तिसऱ्या सेटमध्ये मॅचपॉइंटच्या क्षणी फेडररने मारलेल्या परतीच्या फटक्यावर सॉडरलिन्गचा फटका नेटमध्ये अडकला आणि फेडररला अश्रु आवरले नाहीत. आपण जिंकलो यावर तो विश्वास ठेवू शकत नव्हता. खांद्यावरचे एक मोठे ओझे खाली ठेवल्याचा आनंदही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सामन्यानंतर तो म्हणाला की, ‘हा माझ्या कारकीर्दीतील प्रचंड मोठा विजय आहे. माझ्या खांद्यावरील एक मोठे ओझे आता दूर झाले आहे. आता माझ्या कारकीर्दीच्या अखेपर्यंत मी कोणत्याही दडपणाशिवाय खेळू शकेन. मी रोलँड गॅरोसवर जिंकू शकलो नाही, हे मला ऐकावेही लागणार नाही.’
सॉडरलिन्गने फेडररच्या या विजयाचे कौतुक केले. तो म्हणाला की, फेडरर तुझे खरोखरच कौतुक करावे तेवढे थोडे आहे. टेनिस कसे खेळावे याचा तू आदर्श वस्तुपाठ मला घालून दिलास. टेनिसच्या इतिहासात तू एक महान खेळाडू म्हणून गणला जाशील. म्हणूनच या विजेतेपदावर खरा हक्क तुझाच होता.