Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ऑस्ट्रेलियासाठी ‘कुछ कर दिखाना है’; आज श्रीलंकेशी झुंज
नॉटिंगहॅम, ७ जून / एएफपी

विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या पावलावर पाऊल टाकत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पेचात सापडला आहे. जागतिक क्रमवारीत आपला दबदबा

 

निर्माण करणारा संघ ट्वेन्टी-२० स्पर्धेत साखळीतच गारद झाला तर ती नामुष्की त्यांना कायम छळत राहणार आहे. उद्या श्रीलंकेविरुद्ध साखळीतील त्यांची दुसरी लढत होत असून या लढतीत काहीही करून विजय मिळवायचाच, या जिद्दीने खेळण्याशिवाय त्यांच्यापाशी पर्याय नाही.
ख्रिस गेलच्या तडाखेबंद ८८ धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात सात विकेट्सनी पराभूत करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यातच ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा पराभव होता. या धक्क्यातून त्यातून सावरण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आपल्या डावपेचांत खूप बदल करावे लागतील.
उद्याच्या सामन्यात जरी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला नमविले तरी पुढील सामन्यात जर श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर विजय मिळविल्यास धावगतीवर अव्वल आठ संघात स्थान मिळविण्याचे ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे केवळ उद्याची लढतच त्यांच्यादृष्टीने महत्त्वाची नाही तर वेस्ट इंडिज-श्रीलंका यांच्यातील सामन्याचा निकालही महत्त्वाचा असेल.
त्याशिवाय, उद्याच्या या लढतीत ऑस्ट्रेलियाला केवळ विजय मिळवून चालण्यासारखे नाही तर श्रीलंकेला मोठय़ा फरकानेही नमवावे लागेल.
पॉन्टिंग यासंदर्भात म्हणाला की, आम्हाला काय करायचे आहे, हे चांगले ठाऊक आहे. जर आम्ही उत्कृष्ट असू तर विजय आमचाच असेल.
ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-२० क्रिकेट फारसे फळलेले नाही. आतापर्यंत २२ सामन्यांतून त्यांना ११ सामने जिंकता आले आहेत. तरीही पॉन्टिंग म्हणतो की, आम्ही अजूनही सर्व गमावलेले नाही. या क्रिकेटमध्ये पटकन चित्र बदलू शकते. त्यामुळे आम्ही स्पर्धेच्या सुरुवातीला ज्या स्थितीत होतो, त्या स्थितीत आजही आहोत.
श्रीलंकेचा संघ मात्र लाहोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सामना खेळत आहे.
पाकिस्तानातील त्या घटनेनंतर महेला जयवर्धनेने कर्णधारपद सोडले होते. त्याच्यानंतर कुमार संगकारा संघाचा नवा कप्तान झाला आहे व त्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच श्रीलंका संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. तो म्हणतो की, दडपण नक्कीच ऑस्ट्रेलियावर अधिक असेल पण आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक अजिबात करणार नाही. आम्हाला शर्यतीत टिकून राहायचे असेल तर एक सामना जिंकण्याशिवाय पर्याय नाही. संगकारा म्हणतो की, आमच्याकडे फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात चांगल्या खेळाडूंची फळी आहे. मात्र शेवटी तुम्ही डावपेच कसे राबविता याला अधिक महत्त्व आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट हे योजनाबद्ध क्रिकेट आहे. तुम्हाला विजय मिळविण्यासाठी आपल्या डावाची योग्य आखणी करावीच लागते.